रंगा आणि बिल्ला जोडीला घरी पाठवल्याशिवाय शांत राहणार नाही असं वक्तव्य आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पुण्यात केलं. आपण हिंदू किंवा मुसलमान म्हणून रस्त्यावर उतरलो तर यशस्वी होणार नाही. भारतीय म्हणून रस्त्यावर उतरलो तर यश नक्की मिळेल. १३० कोटी लोकसंख्येचा देश विरुद्ध भाजपा अशी लढाई आहे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे असंही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलं आहे. आज, उद्या आणि त्यापुढेही आपण नागरिक राहणार आहोत पण मोदीची आधी तुमच्या डिग्रीबद्दल बोला असंही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलं आहे. CAA, NRC आणि NPR चा विरोध करण्यासाठी पुण्यात एक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत जिग्नेश मेवाणी यांनी मोदींवर टीका केली आहे.

काहीही झालं तरीही कोणताही कागद दाखवणार नाही हे सगळ्यांनी लक्षात असू द्यावं. मी गुजरातचा आहे मात्र त्या दोन गुजराथींसोबत मी नाही. मात्र मी तुमच्यासोबत इथे उभा आहे. कारण देशासाठी हा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे असंही मेवाणी यांनी म्हटलं आहे. तसंच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे शाहीन बाग येथील आंदोलन बदनाम करत आहेत अशीही टीका मेवाणी यांनी केली.

जिग्नेश मेवाणी यांच्या भाषणाआधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भाषण करुन मोदींवर निशाणा साधला. हिटलरने जे जर्मनीत घडवलं तेच आता मोदी आपल्या देशात घडवू पाहात आहेत अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली.