जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या पुण्यातील सभेची तारीख निश्चित झाल्याचे वृत्त आहे. येत्या १४ एप्रिलला पुण्यात कन्हैयाची सभा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन’ने कन्हैया कुमारच्या जाहीर सभेची घोषणा केली होती.
‘कन्हैया कुमारला पुण्यात बोलावणारच,’ अशी घोषणा पुण्यातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त विचार मंचाने रविवारी पत्रकार परिषदेत केली होती. फिल्म इन्स्टिटय़ूट, रानडे इन्स्टिटय़ूट आणि फर्ग्युसन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संयुक्त विचार मंचाची स्थापना केली आहे. कन्हैया कुमारचा कार्यक्रम शिक्षणसंस्थेत करण्यासाठी विद्यापीठाने परवानगी नाकारल्यास सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रम करण्यात येईल, असेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले होते. फर्ग्युसन महाविद्यालय आणि रानडे इन्स्टिटय़ूटप्रमाणेच मुंबई, बीड, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या ठिकाणीही कन्हैया कुमारला संवादासाठी बोलावण्यात आले आहे. कन्हैया कुमारची पुण्यात सभा घेतल्यास आयोजकांना फोडून काढू, अशी धमकी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुण्यातील एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.