आगामी दहा वर्षांत देश वनाचे क्षेत्र २३ टक्क्य़ांवरून ३३ टक्के एवढे करण्याचे उद्दिष्ट असून केवळ सरकारी आदेशाने ते साध्य होणार नाही. तर, वनाचे क्षेत्र वाढविण्याचा उद्देश जनतेची चळवळ झाल्याखेरीज पूर्णत्वास जाणार नाही, असे मत केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले. वनक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी राखून ठेवलेल्या ३३ हजार कोटी रुपयांच्या निधीपैकी ३० हजार कोटी रुपये राज्यांना वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, सेवावर्धिनी, विज्ञान भारती आणि सेवा सहयोग या संस्थांतर्फे जावडेकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय जैवविविधता पुरस्कारविजेत्या चैतराम पवार यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक माधव गोगटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार अनिल शिरोळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे रवींद्र वंजारवाडकर आणि वनवासी कल्याण आश्रमाचे दिलीप मेहता या वेळी व्यासपीठावर होते. जल आणि जंगल व्यवस्थापनासह संवर्धन करीत चैतराम पवार यांनी केलेला धुळे जिल्ह्य़ातील बारीपाडा गावाचा कायापालट पूर्वार्धात दाखविण्यात आलेल्या लघुपटातून उलगडला.
जावडेकर म्हणाले, एम. कॉम झाल्यावर भटक्या जमातीतील चैतराम पवार यांनी सरकारी नोकरीच्या मोहाला बळी न पडता गावाचा विकास हे ध्येय निवडले. गावक ऱ्यांना एकत्र करीत त्यांनी कु ऱ्हाडबंदी आणि चराईबंदी केली. जंगलाची जपणूक करणे हा आदिवासींचा स्वभाव आहे. चैतराम यांनी केलेल्या प्रगतीचा दूरदर्शनवर कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. ज्यामुळे चैतराम यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक कार्यकर्ते घडतील. जगातील ८ टक्के जैववैविध्य भारतामध्ये आहे. त्याची निगा राखण्यासंदर्भात भारताच्या पुढाकाराने जगभरासाठी कायदा झाला आहे.
माधव गोगटे म्हणाले, बारीपाडा गावच्या विकासाचा विचार मला ओरिसामध्ये नेता आला याचे समाधान वाटते. गावातील जैववैविध्य काय आहे याची जाणीव झाली, तरच गावक ऱ्यांना तिचा विकास करता येईल. जैववैविध्य संगोपनाचा स्वतंत्र आराखडा विकसित करणे गरजेचे आहे.
चैतराम पवार म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून बारीपाडा येथे स्ट्रॉबेरीची शेती सुरू झाली आहे. या ग्रामविकासामध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे योगदान मोठे आहे. अशी आणखी गावे विकसित करण्याची संधी मिळावी. सेवा सहयोग संस्थेतर्फे बारीपाडा गावाला हवामान केंद्र देण्यात येणार असल्याचे वंजारवाडकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.