पुण्यातील फौजदारी न्यायालय क्रमांक – ४ शिवाजीनगर येथील कनिष्ठ लिपीक प्रसन्नकुमार भागवत (वय-५०) रा. पर्वती, पुणे यांना दीड हजार रूपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार यांच्या भावाने दाखल केलेल्या फिर्यादीचा तपास होऊन दाखल दोषारोपपत्राच्या छायांकित प्रती देण्यासाठी प्रसन्नकुमार भागवत यांनी तक्रारदाराकडे दीड हचार रूपयांची मागणी केली होती. यानंतर ही रक्कम बुधवार ३ जुलै रोजी फौजदारी न्यायालय क्र. ५, शिवाजीनगर न्यायालयाच्या दरवाज्या जवळ स्वीकारतांना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

तत्पुर्वी तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालय परिसरात सापळा रचला होता. जेणेकरून प्रत्यक्ष रक्कम हातात घेतांना लिपीकास ताब्यात घेण्याची कारवाई करता यावी. यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदिप दिवाण, अपर पोलिस अधिक्षक दिलीप बोरस्ते व तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त वर्षाराणी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.