अनधिकृत दलालांकडून तिकिटांचा होणारा काळाबाजार लक्षात घेता रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांच्या बुकींगबाबत रेल्वेकडून नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार एका व्यक्तीला एका महिन्यामध्ये केवळ सहाच तिकिटांचे ऑनलाईन बुकींग करता येणार आहे. ऑनलाईन तिकीट बुकींगच्या नव्या नियमांची अंमलबजावणी येत्या १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.
‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावरून करण्यात येणाऱ्या रेल्वेच्या तिकिटांच्या बुकींबाबत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. एका व्यक्तीला त्याच्या युजर आयडीचा वापर करून एका महिन्यात जास्तीत जास्त सहा तिकिटांचे ऑनलाईन बुकींग करता येणार आहे. त्याचप्रमाणे एका दिवसामध्ये एका व्यक्तीला दोन तिकिटांचे बुकींग करता येणार आहे. त्यासाठी सकाळी आठ ते दहा ही वेळ देण्यात येणार आहे.
तत्काळ कोटय़ातूनही एका व्यक्तीला एका दिवसात दोन तिकिटे मिळणार आहेत. त्यासाठी सकाळी दहा ते दुपारी १२ ही वेळ देण्यात येणार आहे. रेल्वेच्या अधिकृत एजन्सीला सकाळी आठ ते साडेआठ या वेळेमध्ये सर्व प्रकारच्या सर्वसामान्य तिकिटांची बुकींग करता येणार आहे. त्याचप्रमाणे या एजन्सीला सकाळी दहा ते साडेदहा व सकाळी ११ ते साडेअकरा या वेळेत तत्काळ एसी व नॉन एसी तिकिटांचे बुकींग करता येणार आहे.