पुणे : आलेल्या ग्राहकांना काय हवे त्याची नोंद कागदावर करीत त्यांना सुहास्यवदनाने तत्पर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये सोमवारी मानाचं उपरणं आणि डोळ्यांमध्ये कृतज्ञ भाव दाटून आले होते. ‘आभारविरहित सेवा’ देणाऱ्या आपल्या कामाची दखल घेऊन कोणी तरी सन्मानाची वागणूक देत सत्कार केला, याचा आनंद या कर्मचाऱ्यांनी अनुभवला. सत्कार स्वीकारण्यासाठी एक-एक जण येत होता खरा. पण, ज्यांच्यामुळे आपण आहोत, त्या ग्राहकांची संतुष्टी ही कर्तव्यभावना त्यांना विसर पडू देत नव्हती.

पुणेकरांच्या जिभेला गेली साठ वर्षांहून अधिक काळ चवीचे खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या ‘हॉटेल वैशाली’तील १२० कर्मचाऱ्यांचा ‘के अँड क्यू’ परिवारातर्फे कामगार दिनाच्या पूर्वदिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. या सर्व कर्मचाऱ्यांशी व्यक्तिगत संबंध असणारे उद्योजक विठ्ठल मणियार, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई आणि पुण्यनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते प्रत्येक कर्मचाऱ्याच्या गळ्यामध्ये उपरणं आणि रौप्यमुद्रा देऊन सत्कार करण्यात आला. हॉटेलमधील ग्राहकांनाही सत्कार करून या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. सत्येंद्र राठी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

साठ वर्षांपूर्वी बीएमसीसीमध्ये शिक्षण घेत असताना आमचा हॉटेल रूपाली येथे कट्टा असायचा. काठी आपटत आलेल्या पोलिसाने हुसकावून लावल्यानंतर आम्ही वैशालीमध्ये येऊन बसायचो. त्या वेळी आठ आण्याला मिळणारी इडलीची डिश आम्ही चार जणांमध्ये मिळून खायचो. खाण्यापेक्षाही गप्पा मारायला निवांत बसता येते हा आनंद मोठा होता, अशा आठवणी विठ्ठल मणियार यांनी जागविल्या. आता देखील दर रविवारी सकाळी सात वाजता मी हॉटेलचे दार उघडण्याच्या वेळी हजर असतो, असेही त्यांनी सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, चितळ्यांची बाकरवडी आणि वैशालीचा सांबार ही पुण्याची जगभरातील ओळख आहे. जगातील कोणत्याही देशातून पुण्याला आल्यानंतर ती व्यक्ती वैशालीला भेट दिल्याशिवाय राहत नाही. असे वैशाली हॉटेल पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. जगन्नाथ शेट्टी यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक कर्मचारी स्वत:चे हॉटेल सुरू करून मालक झाले आहेत, असे डॉ. सतीश देसाई यांनी सांगितले.

आयुष्यात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा सत्कार स्वीकारत आहे. त्यामुळे इतका भारावून गेलो आहे, की बोलण्यासाठी तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत, अशा शब्दांत मंजुनाथ शेट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.