पुण्याच्या उपमहापौर पदावर काँग्रेसचे बंडू गायकवाड विजयी झाल्यानंतर सबसे बडा खिलाडी मंगळवारी महापालिकेच्या सभागृहात दाखल झाले आणि त्यांचे आगमन होताच काँग्रेस नगरसेवकांनी घोषणा देत त्यांचे जोरदार स्वागत केले. या निवडणुकीत माझा पूर्ण सहभाग होता, माझे हात लांब आहेत, असे सूचक विधान कलमाडी यांनी केल्यामुळे ते निलंबित असले, तरी काँग्रेसमध्येच सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले.
उपमहापौरपदावर कलमाडी समर्थक बंडू गायकवाड विजयी झाल्यानंतर महापालिका सभागृहात ‘सबसे बडा खिलाडी-सुरेशभाई कलमाडी’ अशा घोषणा काँग्रेसच्या नगरसेवकांकडून देण्यात आल्या, तर प्रत्युत्तर म्हणून ‘एकच वादा अजितदादा’, ‘अरं अरं घुमतयं काय, अजितदादांशिवाय जमतंय काय’, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिल्या. ही घोषणाबाजी बराच वेळ सुरू होती. घोषणा सुरू असतानाच कलमाडी यांनी व्यासपीठावर जाऊन गायकवाड यांचा सत्कार केला.
खास सभा संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कलमाडी यांना उपमहापौर निवडणुकीत तुम्ही सहभागी होतात का, या निवडणुकीत तुमचा हात आहे का, अशी विचारणा केली असता, हो या निवडणुकीत माझा पूर्ण सहभाग होता. माझे हात लांब आहेत, असे कलमाडी म्हणाले. बंडू गायकवाड हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांना चांगली संधी मिळाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीनेही दिलेला शब्द पाळला आहे, असे कलमाडी म्हणाले.
लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहात का, असे विचारले असता कलमाडी म्हणाले, की पक्ष पातळीवर नाही, मात्र वैयक्तिक पातळीवर माझी तयारी सुरू झाली आहे.