‘मला चित्रपट संग्रहालयाबद्दल कळले ते पी. के. नायर यांच्याकडून. प्रत्येक मोठय़ा शहरात चित्रपट संग्रहालयाची सोय असणे आवश्यक असून, चित्रपटांच्या जतन व संवर्धनासाठी संस्था सुरू करून त्याला नायर यांचे नाव द्यायला हवे,’ अशी सूचना करत प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे पहिले संचालक नायर यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. चित्रपटांच्या जतनाविषयीच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपासाठी ते रविवारी पुण्यात बोलत होते.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (एनएफएआय) ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्हज’ (एफआयएएफ) आणि ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’च्या सहकार्याने या दहा दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा, फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे शिवेंद्रसिंग डुंगरपूर, एफआयएएफचे ख्रिस्तोफर डय़ुपिन, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम या वेळी उपस्थित होते.
‘फिल्म हेरिटेज मिशनसाठी पाच वर्षांसाठी ५९७ कोटींच्या निधीची तरतूद असून, त्याचा २० कोटींचा पहिला टप्पा काहीच दिवसांत वितरित केला जाईल. हे मिशन एनएफएआयमधूनच चालेल,’ अशी घोषणा या वेळी अरोरा यांनी केली.
कमल हासन म्हणाले, ‘केवळ चित्रपटात काम करतो म्हणून नव्हे, तर चित्रपटरसिक म्हणून मला असे वाटते, की प्रत्येक मोठय़ा शहरात चित्रपट संग्रहालयाची सोय असायला हवी. चित्रपटांच्या विद्यार्थ्यांना कुठेही त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. नायर आणि त्यांच्या टीमने जतन केलेले १२ हजार चित्रपट त्यांच्यासाठी उपलब्ध व्हायला हवेत. सरकार आणि राज्यांनाही ही विनंती आहे.’

‘पूर्वीच्या चित्रपटांत केलेल्या कामाबाबत लाज वाटते’

‘मी माझ्या जुन्या चित्रपटांमधील काम पाहतो तेव्हा मी भावनिक नाही, उलट एक प्रकारे त्या कामाची लाजच वाटते. मी आणखी चांगले करू शकलो असतो,’ असे कमल हासन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘माझे गुरू  के. बालचंद्रन यांनी माझ्याकडून काम करवून घेतले, त्यामुळे पडद्यावर मी काहीतरी बरे करू शकलो. त्यांचा मी आभारी आहे आणि प्रेक्षकांचाही. त्या वेळचे प्रेक्षक अधिक क्षमाशील होते!’