प्रादेशिक भाषांच्या जतन व संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘भाषा’ या संस्थेतर्फे तीन दिवसांच्या ‘कथायात्रा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रसिकांना नृत्य, नाटय़, कथन, सांगीतिका, लोककला, बाहुली नाटय़ अशा विविध माध्यमांमधून गोष्टींचा आनंद घेता येईल. संस्थेच्या अध्यक्ष स्वाती राजे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे हा महोत्सव चालणार असून तो सर्वासाठी विनामूल्य खुला आहे.
२१ तारखेला सायंकाळी ६ वाजता ‘नवरस कथा’ या कार्यक्रमात कथक बॅलेच्या माध्यमातून नवरसांशी संबंधित कथांचे सादरीकरण केले जाईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी अमेरिकेतील ‘आर्ची’ या जगप्रसिद्ध ‘कॉमिक्स’च्या प्रमुख कार्यकारी अधिकारी नॅन्सी सिल्बरक्लिट या कॉमिक्सची कथा उलगडून दाखवतील. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक मानव कौल यांच्या ‘शक्कर के पांच दाने’ या हिंदी नाटकाचे सादरीकरणही केले जाईल.
२२ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता आजी- आजोबांसाठी गोष्ट सांगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११.३० वाजता भोपाळमधील रंग-श्री संस्थेतर्फे ‘पंचतंत्र’ हे लोककलेवर आधारित बालनाटय़ सादर केले जाईल. १२.३० ते ३.३० या वेळात ‘चला गोष्ट विणू या’ ही कार्यशाळा होणार आहे. या वेळी पुण्यातील ‘कॉक्लिआ’ या संस्थेतर्फे कर्णबधिर मुलांकडून खास त्यांच्या भाषेत गोष्ट बनवून घेतली जाईल. कोलकात्याच्या ‘चाय- पानी’ या संस्थेतर्फे मुलांसाठी नाटय़कलेसंबंधीच्या कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. ४.३० वाजता ओडिशा आणि कोलकात्याच्या सीमेवरील ‘पट्टचित्र’ या लोककलेच्या माध्यमातून कथा सादर केली जाईल. कीर्तन कलेतून गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम ५.३० वाजता होईल. ६.३० वाजता ज्येष्ठ लेखक व कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो ‘माझी संघर्षयात्रा’ या कार्यक्रमात सामाजिक जीवनात आपल्याला आलेल्या अनुभवांचे कथन करतील. ७.३० वाजता मुंबईच्या अर्पणा थिएटरचे कलाकार ‘स्टोरीज इन अ साँग’ ही संगीतिका सादर करतील.
२३ तारखेला सकाळी ७ वाजता ‘जनवाणी’ या संस्थेतर्फे ‘कथा जुन्या पुण्याची’ या ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. ९.३० वाजता अबिद सुरती यांच्या ‘नानी की कहानी- पानी की कहानी’ या पर्यावरणविषयक कथांचे सादरीकरण होईल. दुपारी ११ वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने लहान मुलांसाठी ‘गोष्ट वर्तमानपत्राची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० ते ३.३० दरम्यान ‘चाय- पानी’ संस्थेतर्फे पट्टचित्र कला व न्याटय़कलाविषयक कार्यशाळा होईल. समारोपाच्या कार्यक्रमात सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक विवेक सावंत यांचे ‘भाषा : जपणूक आणि तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान होईल. भोपाळच्या ‘लिटिल बॅले ट्रप’ या गटाच्या ६० वर्षांपासून गाजणाऱ्या ‘रामायण’ या बाहुलीनाटय़ाने महोत्सवाची सांगता केली जाईल.
आजी- आजोबांच्या गोष्ट सांगा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच महोत्सवातील कार्यशाळांना उपस्थित राहण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी ०२०-२५५३८१८१, ९९७००४४२८९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.