नानासाहेब पेशवे जलाशय (कात्रज तलाव) येथील नव्या अत्याधुनिक संगीत कारंज्याचे तसेच माहिती केंद्राचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा विषय महापालिकेत वादाचा ठरला असून या कार्यक्रमावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष आमने-सामने आले आहेत.
कात्रज तलाव सुशोभीकरण तसेच या तलावाशी संबंधित अनेक विकासकामे स्थानिक नगरसेवक आणि मनसेचे गटनेता वसंत मोरे यांनी गेली सात वर्षे सातत्याने केली असून तलावात बसवण्यात आलेल्या संगीत कारंज्याची योजनाही मोरे यांच्याच प्रयत्नातून साकारली आहे. कारंज्याबरोबरच कात्रज येथे त्यांनी माहिती केंद्रही विकसित केले आहे.
या दोन्ही विकासकामांचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करावे असे पत्र मोरे आणि विरोधी पक्षनेता काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी पक्षनेत्यांच्या सभेला दिले होते. पक्षनेत्यांची सभा १० डिसेंबर रोजी झाली होती. मात्र, त्या सभेत या विषयाबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे हा विषय पुढे ढकलण्यात आला होता. हा विषय मंगळवारी पक्षनेत्यांच्या सभेपुढे आल्यानंतर मोरे आणि सभागृहनेता सुभाष जगताप यांच्यात जोरदार वादंग झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कारज्यांचे उद्घाटन झाले पाहिजे, असा आग्रह जगताप यांनी सभेत धरला. त्यावरून एवढा वाद झाला, की या सभेतही निर्णय न होता हा विषय पुन्हा पुढे ढकलण्यात आला.
या विकासकामांचे उद्घाटन अजित पवार यांनी करावे असा ठराव स्थानिक नगरसेविका भारती कदम यांनी यापूर्वीच दिला होता आणि तो मुख्य सभेत मंजूरही झाला आहे. तो ठराव मंजूर होताना मोरे अनुपस्थित होते. ठराव मंजूर झाल्यानंतर आता पुन्हा ठाकरे यांना बोलावण्याचा प्रश्नच येत नाही, असे जगताप यांचे म्हणणे होते.
कात्रज तलाव विकासासाठी मी सात वर्षे प्रयत्न करत आहे. तेथील प्रत्येक कामासाठी मी तरतुदी करून करून घेतल्या आणि सुशोभीकरणासह अनेक कामे करून घेतली. हे सर्व पक्षांना माहिती आहे. फक्त या कामांचे श्रेय आम्हाला मिळू द्यायचे नाही यासाठीच अजित पवार यांना बोलावण्याचा आग्रह धरणे हे राजकारण आहे. फक्त ठराव मंजूर करून श्रेय मिळवण्याचा हा प्रयत्न असून हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने या भागात काय ते करू, असा इशारा पक्षनेते सभेनंतर मोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.