जिल्हा केरोसीनमुक्त करण्याचा संकल्प

केरोसीनचा वापर कमी करण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनाकडून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे केरोसीनचा वापर कमी होत आहे. जिल्हा केरोसीनमुक्त करण्यासाठी गॅस सुविधा असलेल्या शिधापत्रिकाधारकांचा केरोसीनचा पुरवठा नव्या वर्षांत बंद करण्यात येणार असून जिल्हा केरोसीनमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्य़ात गॅसजोडणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांचा केरोसीनचा पुरवठा बंद करण्याची मोहीम गेले वर्षभर राबविण्यात आली. गॅसजोडणी असतानाही केरोसीन घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे केरोसीनची मागणी कमी झाली आहे. डिसेंबर २०१७ अखेर ४० टक्के वापर कमी झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्य़ात केरोसीनचा वापर बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरू आहे. तसेच ग्रामीण भागासाठी धान्य वितरण आधारक्रमांक जोडणी करणाऱ्यांनाच केले जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आधार क्रमांक देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सध्या ८७ टक्के नागरिकांना आधार क्रमांक देण्यात आले आहेत. गॅसचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असला, तरी केरोसीनही वापरले जात आहे. त्यामुळे आता केरोसीनचा वापर बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

दोन लाख कार्डाची आधार जोडणी

  • जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात १६९६ स्वस्त धान्य दुकाने असून जिल्ह्य़ात १० हजार ८६७ अंत्योदय कार्डधारक आहेत.
  • त्यामध्ये ४६ हजार ६६७ कुटुंब सदस्य आहेत.
  • त्यापकी ७ हजार ९९४ अंत्योदय कार्ड हे आधारजोडणी करण्यात आले आहेत.
  • अन्नसुरक्षा कार्डधारक ३ लाख ३७ हजार ३९७ आहेत.
  • त्यामध्ये १३ लाख ९७ हजार ९७ कुटुंब सदस्य संख्या आहे.

त्यातील २ लाख ७१ हजार २३६ कार्ड हे आधार जोडणी झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.