21 February 2019

News Flash

शहराच्या पूर्व भागाचे पाणी ‘जलसंपदा’ने तोडले

जलसंपदा विभागाला पत्र पाठवून दिवाळीपर्यंत प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली

खडकवासला धरणाचे संग्रहित छायाचित्र

महापौरांची थेट मंत्र्यांकडे तक्रार; आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत

पुणे : जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणावरील महापालिकेचे पंप थेट  पोलीस बंदोबस्तात बंद करत शहराच्या पूर्व भागाचे पाणी तोडले. परिणामी पूर्व भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले. गुरुवारी सायंकाळी महापौर मुक्ता टिळक यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार केली. त्यानंतर शहराला प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे महाजन यांनी मान्य केले. शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) सुरळीत होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शहराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी चार ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये शहराला प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रतिदिन दोनशे दशलक्ष लिटर एवढी कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून बुधवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी ११५० दशलक्ष लिटर पाणी शहराला दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात खडकवासला येथील महापालिकेचे दोन पंप बंद केले. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हे पंप पुन्हा सुरू केले जाऊ नयेत यासाठी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, शहराच्या गरजेइतके पुरेसे पाणी न मिळाल्याने शहराच्या पूर्व भागातील हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, टिंगरेनगर, लष्कर इत्यादी भागांना गुरुवारी कमी  पाणीपुरवठा झाला, तर काही भागांत पाणीच मिळाले नाही. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्याने गुरुवारी महापालिका प्रशासनाची एकच धावपळ उडाली. दुपारनंतर महापौर मुक्ता टिळक यांनी थेट जलसंपदामंत्र्यांशी संपर्क साधून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे महाजन यांनी मान्य केले.

जलसंपदा विभागाने बुधवारी पूर्वसूचना न देता खडकवासला येथील पंप बंद केल्याने शहराच्या काही भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मात्र, शुक्रवारपासून प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे जलसंपदामंत्री महाजन यांनी मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. तसेच महापालिका प्रशासनाने गुरुवारी जलसंपदा विभागाला पत्र पाठवून दिवाळीपर्यंत प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली असून त्यानंतर कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पाणी द्यावे, असे पत्रात कळवले आहे. दरम्यान, कालवा समितीच्या बैठकीनंतर पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, असा दावा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला होता. तो दावा फोल ठरल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला कोणतीही पूर्वसूचना न देता शहराचा पाणीपुरवठा खंडित केला. अशा प्रकारे पाणीपुरवठा खंडित करण्याची तिसरी वेळ आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत जलसंपदा विभागातील खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चोपडे यांच्याशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

First Published on October 12, 2018 3:52 am

Web Title: khadakwasla dam pune municipal corporation pune mayor