धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेचाही अंदाज

पुणे शहर आणि परिसरातील तापमानातील वाढ कायम असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाबरोबरच पुणे शहरातही पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. दुपारी तुरळक ठिकाणी धुळीचे वादळ आणि मेघगर्जना होण्याचा अंदाजही देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट असून, काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, तो देशात उच्चांकी ठरतो आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये सध्या तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. शहराचा कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहतो आहे. बुधवारी शहरात ३९.८ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या शहरातील आकाशाची स्थिती निरभ्र आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार ११ एप्रिलला तुरळक ठिकाणी धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. १२ आणि १३ एप्रिलला आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी तुरळक ठिकाणी धुळीचे वादळ, मेघगर्जनेचा अंदाज आहे. १४ एप्रिलला काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलका पाऊस, तर १५ आणि १६ एप्रिललाही शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात उच्चांकी तापमान

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ात ११ आणि १२ एप्रिलला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी विदर्भातील ब्रद्मपुरी येथे राज्यातील, नव्हे तर देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूर, वर्धा, अकोला, चंद्रपूर आदी ठिकाणचा पारा ४३ अंशांवर आहे. नगर, मालेगाव, सोलापूर, अमरावती या ठिकाणी ४२ अंश तापमान आहे. मराठवाडय़ात सर्वच ठिकाणी ४१ अंशांच्या आसपास किमान तापमानाचा पारा आहे.