स्वारगेट परिसरात रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गच नाही

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत असल्याचा दावा सातत्याने करणाऱ्या महापालिकेने जेधे चौकातील (स्वारगेट परिसर) हजारो पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केले आहे. स्वारगेट येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल बांधणाऱ्या महापालिकेने या भागात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. उड्डाणपूल बांधताना पादचाऱ्यांसाठी दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन होते. मात्र प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे हे भुयारी मार्ग बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे हजारो पादचाऱ्यांना या चौकात जीव मुठीत घेऊन रस्ते ओलांडावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितताही कागदावरच राहिली आहे.

स्वारगेट परिसरात सातत्याने होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या चौकात इंग्रजी वाय आकाराचे उड्डाणपूल आणि पादचाऱ्यांसाठी दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हे काम देण्यात आले होते. उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात येतील. तसेच प्रस्तावित मेट्रो मार्गिकेला आणि स्वारगेट परिसरातील बसथांब्याला भुयारी मार्गाच्या कामाचा कोणताही अडथळा होणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधण्याची घोषणा हवेतच विरली आहे. पादचाऱ्यांसाठी दोन भुयारी मार्ग बांधण्याऐवजी महापालिकेकडून वाहनांसाठी भुयारी मार्ग  बांधण्यात आला आहे.

सातारा रस्त्याने कर्मवीर भाऊराव पाटील चौक (व्होल्गा चौक) ते शंकरशेठ रस्त्याकडे जाणारी एक मार्गिका आणि सारसबागेच्या दिशेला उतरणारी एक मार्गिका अशा वाय आकाराच्या उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. स्वारगेट बस स्थानक, पीएमपीच्या बसथांब्यांमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कात्रजच्या दिशेने एक आणि शिवाजी रस्त्याच्या बाजूला एक असे दोन भुयारी मार्ग येथे प्रस्तावित होते. उड्डाणपुलाच्या आराखडय़ात भुयारी मार्गाची रचनाही दर्शविण्यात आली होती. मात्र त्यांची बांधणी करण्यात आली नाही. नसल्याची बाब पादचारी प्रथम संस्थेचे निमंत्रक प्रशांत इनामदार यांनी महापलिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे.

दोन वर्षांची प्रतीक्षा!

मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचा काही भाग भुयारी आहे. स्वारगेट परिसरात मेट्रो, एसटी, पीएमपी आणि वाहतुकीच्या खासगी सेवांसाठी ट्रान्सपोर्ट हबची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याला मान्यताही मिळाली आहे. त्यामध्ये भुयारी मार्गाचेही नियोजन आहे. मात्र काम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुयारी मार्गासाठी किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पादचाऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. आराखडय़ातही ते दर्शविण्यात आले होते. भुयारी मार्ग आणि पदपथांच्या अभावी पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. जेधे चौक परिसरात जे पदपथ आहेत त्यावरही अतिक्रमणे झाली आहेत. आराखडय़ानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी मागणी पादचारी प्रथम संस्थेचे निमंत्रक प्रशांत इनामदार यांनी केली आहे.

अन्य कोणतीही सुविधा नाही

भुयारी मार्ग नसल्यामुळे शेकडो पादचाऱ्यांची त्रेधातिरपीट होत आहे. जेधे चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्वारगेट बसस्थानकात येणाऱ्या राज्य महामंडळाच्या बस, पीएमपीचे थांबे, तीन ते चार सिग्नल, खासगी सहा आसनी रिक्षांचा वावर यामुळे परिसर गजबजलेला असून सतत एक सिग्नल सुटलेला असतो. त्यामुळे रस्ता ओलांडताना शेकडो प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे.

पादचाऱ्यांची सुरक्षितता वाऱ्यावरच

पादचाऱ्यांना विना अडथळा रस्ता ओलांडता यावा, पदपथांवरून विना अडथळा चालता यावे यासाठी महापालिकेने पादचारी सुरक्षितता धोरण तयार केले आहे. याशिवाय अर्बन गाईडलाईन्सच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्त्यांची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रत्यक्षात पादचारी हा वाहतुकीशी निगडित प्रमुख घटक असताना त्याची सुरक्षितता वाऱ्यावरच सोडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

उड्डाणपूल बांधताना भुयारी मार्गाचे नियोजन करण्यात आले होते. प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे भुयारी मार्ग न बांधण्याचा निर्णय स्थायी समितीच्या मान्यतेनंतर घेण्यात आला. मेट्रोच्या कामानंतर पादचाऱ्यांना सुविधा उपलब्ध होईल.     श्रीनिवास बोनाला, वाहतूक विभाग प्रमुख, पुणे महापालिका