साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु आणि दिलीपकुमार यांची कारकिर्द समकालीन आहे. दिलीपकुमार यांच्या चित्रपटांमध्ये नेहरु यांच्या विचारांचा शोध घेण्यामध्ये काही तरी गफलत होत आहे. ‘नेहरुंचा नायक दिलीपकुमार’ या पुस्तकामध्ये नेहरु यांचा संदर्भ वगळून चित्रपटाचे रसग्रहण उत्तम केले आहे. पण, त्यामध्ये नेहरु शोधायला गेलो तर, दुधात मिठाचा खडा आल्यासारखे वाटते, असे मत साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी रविवारी व्यक्त केले.

लाटकर प्रकाशनतर्फे लॉर्ड मेघनाद देसाई यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या ‘नेहरुंचा नायक दिलीपकुमार’ या दीपक देवधर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे, तसेच देवधर यांच्या ‘लोकसत्ता’मधील सदर-लेखनावर आधारित ‘तंत्रजिज्ञासा’ या पुस्तकाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. रोजच्या वापरातील उपकरणांमधील तंत्र आणि विज्ञान समजावून सांगणाऱ्या लेखांचा ‘तंत्रजिज्ञासा’मध्ये समावेश आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे, आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार, लाटकर प्रकाशनचे आनंद लाटकर आणि नंदन देऊळकर या वेळी उपस्थित होते.

नेहरु आणि दिलीपकुमार दोघेही देखणे, स्वप्न पाहणारे, खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि पुरोगमी ही दोघांमधील साम्यस्थळे आहेत. पण, दिलीपकुमार यांच्या चित्रपटातूंन नेहरु यांचे दर्शन हे गृहीतकच चुकीचे आहे, असे सांगून देशमुख म्हणाले, की नेहरु यांच्या विचारांचे दर्शन चित्रपटातील भूमिकेच्या विश्लेषणाशी मिळतेजुळते नाही. हे चित्रपट नेहरु यांच्यापेक्षाही गांधी विचारांचा वेध घेणारे आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील फरक स्पष्ट करताना आपटे म्हणाले, तंत्रज्ञान प्रश्नाचा विचार करून थांबण्यापेक्षा आचरणात आणण्यावर भर देते. आता तंत्रज्ञानाचा वापर करून विज्ञान शिकविले जाते. ‘यंत्रशास्त्राची मुळे’ या १८५५ मध्ये प्रकाशित झालेल्या तंत्रज्ञानावरील पहिल्या पुस्तकाचा आता मागमूसही नाही. या विषयावरील विपुल लेखनातूनच तंत्रज्ञानाची उमज आणि भान वाढू शकेल.

देवधर, जकातदार यांनीह मनोगत व्यक्त केले. लाटकर यांनी प्रास्ताविक केले. निहारिका मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.

टीका अनुवादकावर नाही

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात टीकात्म बोलू नये असा संकेत आहे. मी लॉर्ड मेघनाद देसाई यांच्या लेखनाचा चाहता आहे. पण, हे पुस्तक म्हणजे त्यांचा फसलेला प्रयोग आहे, असे सांगत लक्ष्मीकांत देशमुख यांनी, माझी टीका अनुवादकावर नाही, तर  मूळ लेखकावर असल्याचे स्पष्ट केले. बडोद्याला मी स्पष्टपणे बोलू शकलो. मग, जे पटले नाही ते इथे सांगण्यात गैर काय, असेही देशमुख म्हणाले.