स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स – एलबीटी) रद्द करण्याबाबत मागण्या होत असल्या, तरी अद्याप एलबीटी लागू असल्यामुळे तो भरणे बंधकारक आहे. मात्र, तो चुकवला जात असल्याचे लक्षात येत असून महापालिकेने गेल्या दोन दिवसांत एलबीटी चुकवणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर कारवाई केली. एलबीटी न भरणाऱ्यांच्या विरोधात पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली असून आयात मालाची तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये जाऊन आयात मालाची तपासणी सुरू करण्यास राज्य शासनाने महापालिकेला अनुमती दिली आहे. त्यानुसार गेले दोन दिवस तपासणी हाती घेण्यात आली होती. शहराच्या विविध भागात केलेल्या या तपासणीत सहा व्यापाऱ्यांनी सात कोटी चाळीस लाखांचा माल आयात केल्याचे व एलबीटी न भरल्याचे दिसून आले. या आयात मालावर एलबीटीचा भरणा केला नसल्याचे दिसल्यानंतर संबंधितांकडून कराची रक्कम अधिक दंड असे साडेबारा लाख रुपये वसूल करण्यात आले. एलबीटी विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी ही माहिती दिली.
विधासनभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एलबीटी रद्द होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या महिन्यात सर्व महापौर व आयुक्तांची बैठक घेऊन एलबीटी बाबत आढावा घेतला होता. तसेच सर्व महापालिकांकडून अहवालही मागवले होते. शासनाने ही प्रक्रिया सुरू केल्यामुळे एलबीटी रद्द होणार असेच सर्वाना वाटत होते. त्यामुळे एलबीटीचा भरणाही काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, महापालिकेने पुन्हा एकदा एलबीटी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली असून दंडाचीही आकारणी सुरू केली आहे.