News Flash

एलबीटी: पुणे, पिंपरीच्या उत्पन्नात शंभर-शंभर कोटींची घट

स्थानिक संस्था कराच्या उत्पन्नात पुणे आणि पिपरी या दोन्ही महापालिकांना पहिल्या तिमाहीमध्ये मोठा फटका बसला असून दोन्ही महापालिकांचे उत्पन्न प्रत्येकी १०० कोटी रुपयांनी घटले

| July 24, 2013 02:44 am

स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) उत्पन्नात पुणे आणि पिपरी या दोन्ही महापालिकांना पहिल्या तिमाहीमध्ये मोठा फटका बसला असून दोन्ही महापालिकांचे उत्पन्न प्रत्येकी १०० कोटी रुपयांनी घटले आहे. महापालिका प्रशासनाकडून मात्र उत्पन्न घटल्यानंतरही आकडेवारीचा खेळ करत एलबीटीचे उत्पन्न चांगले असल्याचाच दावा अजूनही केला जात आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१३ रोजी सुरू झालेल्या आर्थिक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी महापालिकांमध्ये जकात रद्द करून एलबीटी हा नवा कर लागू करण्यात आला आहे. आर्थिक वर्षांच्या तिमाहीचा आढावा घेता दोन्ही महापालिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेचे सन २०१२ मधील पहिल्या तिमाहीचे जकातीचे उत्पन्न ३१६ कोटी रुपये इतके होते. त्यात नैसर्गिक किमान वाढ गृहित धरली, तरी ते यंदाच्या पहिल्या तिमाहीत ३५० कोटींपर्यंत जाणे अपेक्षित होते. चालू वर्षांतील एलबीटीचे प्रत्यक्ष उत्पन्न मात्र २२२ कोटी रुपये इतकेच झाले आहे. त्यामुळे जकातीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न सरळसरळ सव्वाशे कोटी इतके कमी झाल्याचे दिसत आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न कमी येऊनही महापालिका प्रशासनाला मात्र हा आकडा मान्य नाही. तूट ४५ कोटी इतकीच असल्याची माहिती आयुक्त महेश पाठक यांनी मंगळवारी स्थायी समितीत दिली. राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्क वसूल करताना जी अतिरिक्त एक टक्का रक्कम गोळा केली जात आहे त्यातून पुण्यात ५० कोटी रुपये जमा झाले आहेत. ते शासनाकडून मिळतील, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. मुळात, ही अतिरिक्त रक्कम आहे. त्या रकमेचा आणि एलबीटीचा संबंध नाही. तरीही ती एलबीटीमध्ये धरली जात आहे. त्यामुळे वसुली कमी झालेली नाही असा दावा केला जात आहे. तसेच शासनाकडे महापालिकेचे शेकडो कोटी रुपये आधीच थकलेले असताना ही रक्कम केव्हा मिळणार याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.
पिंपरीतही उत्पन्न घटले
जकातीच्या भरघोस उत्पन्नामुळे श्रीमंत ठरणाऱ्या िपपरी महापालिकेला एलबीटीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे तीन महिन्याच्या तुलनात्मक आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तीन महिन्यात जकातीचे उत्पन्न २९२ कोटी होते, तर चालू आर्थिक वर्षांत पहिल्या तीन महिन्यात एलबीटीपासून जेमतेम १९३ कोटी रुपये पालिकेला मिळाले आहे. िपपरीतील व्यापारी वर्गाच्या तीव्र विरोधानंतर बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्या आणि हळूहळू व्यापाऱ्यांनी नोंदणी करण्यास व एलबीटी भरण्यास सुरूवात केली. तथापि, जकातीतून मिळणारे उत्पन्न व एलबीटीचे उत्पन्न यामध्ये कमालीची तफावत आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ८१ कोटी, मे मध्ये १०७ कोटी व जून महिन्यात १०४ कोटी असे मिळून तीन महिन्यात २९२ कोटी रुपये उत्पन्न जकातीमधून मिळाले होते. चालू वर्षी एलबीटी लागू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात ५२ कोटी, मे मध्ये ७६ कोटी व जून मध्ये ६५ कोटी असे मिळून तीन महिन्यात १९३ कोटी रूपये एलबीटीचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे जकातीच्या तुलनेत १०० कोटींचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात, एलबीटीचे प्रमुख अशोक मुंढे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांमध्ये औद्योगिक मंदीचा काळ नव्हता. त्यामुळे जकातीचे चांगले उत्पन्न मिळाले होते. मात्र, जुलैपासून मंदीचा फटका बसू लागला होता, त्याचा परिणाम म्हणून उत्पन्नही घटले होते. त्यामुळे एलबीटीचा सुरुवातीचा काळ व जकात उत्पन्नाचा भरभराटीचा काळ यांच्यात तुलना करणे चुकीचे ठरेल. प्रारंभिक अवस्थेत एलबीटीचे उत्पन्न कमी वाटत असले, तरी यापुढील काळात टप्प्याटप्प्याने उत्पन्न वाढत जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 2:44 am

Web Title: lbt income reduced by 100 cr both in pune and pimpri
Next Stories
1 मराठवाडा मित्रमंडळाच्या ‘आर्किटेक्चर’च्या विद्यार्थ्यांचे भविष्य अजूनही अंधारात
2 ‘कार्बन न्यूट्रल इको हाऊस’चे वळवण उद्यानामध्ये उद्घाटन
3 पिंपरी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे यांचा राजीनामा
Just Now!
X