News Flash

भाजपला पाठिंबा दिल्यामुळेच काँग्रेसकडून व्यापाऱ्यांची बदनामी

शहरातील सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी १५ जूनपर्यंतचा संपूर्ण स्थानिक संस्था कर भरलेला आहे. कोणीही हा कर बुडलवेला नाही. मात्र ...

| June 28, 2015 03:30 am

शहरातील सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी १५ जूनपर्यंतचा संपूर्ण स्थानिक संस्था कर भरलेला आहे. कोणीही हा कर बुडलवेला नाही. मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता त्याचा बदला आता काँग्रेसकडून घेतला जात आहे, असा दावा पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
पुण्यातील सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) मोठय़ा प्रमाणात चुकवला असल्याने त्यांच्यावरील कारवाईसाठी राज्य शासनाने महापालिकेला परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे यांनी शुक्रवारी केली होती. या मागणीसंबंधी सराफी व्यावसायिकांची बाजू शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. एलबीटीचा भरणा करण्याबाबतच्या माहितीची कोणतीही शहानिशा न करता काँग्रेसने व्यापाऱ्यांवर जो आरोप केला आहे त्याबाबत दु:ख वाटते असे सांगून रांका म्हणाले की, एलबीटी भरलेला नाही असा दावा ज्या व्यापाऱ्यांबाबत महापालिका करत आहे तो अत्यंत चुकीचा आहे. जून १५ पर्यंतचा एलबीटी व्यापाऱ्यांनी भरलेला असून यादीतील ज्या व्यापाऱ्याने एलबीटी चुकवलेला आहे असे दिसून आले तर आम्ही दहापट रक्कम भरायला तयार आहोत.
राज्य शासन तपासणीसाठी परवानगी देत नाही हे नाटक महापालिकेने करू नये. आम्ही सर्व कागदपत्रे दाखवायला तयार आहोत. त्यामुळे आमची कागदपत्रे तपासून महापालिकेने आम्ही एलबीटी चुकवल्याचे सिद्ध करून दाखवावे असे आव्हानही रांका यांनी महापालिकेला दिले आहे. एलबीटी प्रमुखांनी महापालिका आयुक्तांना चुकीची माहिती दिली आहे, असाही दावा यावेळी करण्यात आला. आम्ही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यामुळेच आमच्या बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले असून हा केवळ सूड उगवण्याचा प्रकार आहे. सूड घेण्यासाठी आमची बदनामी केली जात आहे आणि आमच्याबाबत पुणेकरांची दिशाभूल केली जात आहे असेही संघटनेचे म्हणणे आहे.
अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
काँग्रेसने व्यापाऱ्यांवर आरोप करून आमच्या अब्रुनुकसानीचा प्रयत्न केला आहे. एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेनेही यासंबंधी खोटी माहिती जाहीर केली असून महापालिका व काँग्रेसच्या विरोधात संघटनेतर्फे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाणार असल्याचेही संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 3:30 am

Web Title: lbt tax bjp congress fatehchand ranka
टॅग : Bjp,Congress,Lbt,Tax
Next Stories
1 कचरा वर्गीकरणाबाबत पालिका कामगारांचा प्रकल्प कौतुकास्पद
2 शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून जमावाचा दलित कुटुंबावर हल्ला
3 ‘क्विकर’ संकेतस्थळावर खोटी जाहिरात देऊन संगणक अभियंत्याला घातला गंडा
Just Now!
X