विजेची बचत व पर्यावरणपूरक दिव्यांच्या वापरासाठी केंद्र शासनाच्या योजनेनुसार महावितरण कंपनीकडून शहरात सुरू करण्यात आलेल्या एलईडी दिव्यांच्या सवलतीच्या दरातील विक्रीला दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दोन आठवडय़ांमध्ये पुणेकरांनी सव्वालाखाच्या आसपास दिव्यांची खरेदी केली आहे. पुढील दोन-तीन महिने ही योजना सुरूच ठेवण्यात येणार असून सुमारे एक कोटी दिव्यांच्या वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या ‘डेमोस्टीक इफिशियंट लायटींग प्रोग्राम’ या योजनेच्या अंतर्गत पुणे शहरातही सवलतीच्या दरामध्ये एलईडी दिव्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये दिव्यांच्या विक्रीसाठी तीस केंदं्र उघडण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. बाजारामध्ये सुमारे तीनशे ते चारशे रुपयांना मिळणारा एलईडीचा दिवा या योजनेमध्ये शंभर रुपयांना दिला जात आहे. प्रत्येक ग्राहकाला दहा दिवे दिले जात आहेत. हे दिवे एकाच वेळी रोख स्वरुपात किंवा चार दिवे हप्त्यानेही घेता येत आहेत.
दिव्यांच्या वितरणासाठी एनर्जी एफिशियंसी सव्र्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीच्या वतीने केंद्रं चालविण्यात येत आहेत. कंपनीने दिव्यांची माहिती देण्यासाठी कॉल सेंटरही सुरू केली आहेत. रास्ता पेठ, बंडगार्डन, पर्वती, नगर रस्ता, पद्मावती या विभागातील ग्राहकांना ७८४१९२९१०३ या क्रमांकावर, तर कोथरूड, शिवाजीनगर, िपपरी व भोसरी विभागातील ग्राहकांना ९६५७८८४१९१ या क्रमांकावर माहिती मिळू शकेल.
दिव्यांच्या वितरणासाठी सुरू असलेले केंद्र पुढीलप्रमाणे- महावितरणची रास्ता पेठ येथील प्रसासकीय इमारत, रविवार पेठ शाखा कार्यालय, सोमवार पेठ शाखा कार्यालय, कसबा पेठ उपविभाग कार्यालय, वानवडी शाखा कार्यालय, एनआयबीएम शाखा कार्यालय, कोंढवा शाखा कार्यालय, नाना पेठ शाखा कार्यालय, मंगळवार पेठ शाखा कार्यालय (जुना बाजारजवळ), नगर रस्ता विभाग कार्यालय (कल्याणीनगर), नगर रस्ता उपविभाग कार्यालय (शास्त्रीनगर), वडगाव शेरी उपविभाग कार्यालय, विश्रांतवाडी उपविभाग कार्यालय, इऑर्बिट मॉलजवळ, पद्मावती विभाग कार्यालय (सातारा रस्ता), पर्वती विभाग कार्यालय (पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ, सिंहगड रस्ता), जनता वसाहत (पानमळा, सिंहगड रस्ता), शिवाजीनगर उपविभाग कार्यालय (गणेशखिंड), शिवाजीनगर ग्राहक सुविधा केंद्र (चतुशृंगी मंदिरासमोर), खडकी शाखा कार्यालय, वडारवाडी, बावधन, औंध उपविभाग कार्यालय, बाणेर शाखा कार्यालय, बंडगार्डन विभाग कार्यालय, रामटेकडी शाखा कार्यालय (ताडीवाला रस्ता), कोथरूड विभागांतर्गत वारजे उपविभाग कार्यालय, कोथरूड उपविभाग कार्यालय, भोसरी विभागांतर्गत प्राधिकरण उपविभाग कार्यालय (काचघर चौक), भोसरी उपविभाग कार्यालय (लांडेवाडी चौक).