पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथे रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ऊसतोड कामगार असलेली एक महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागात ऊसतोडणी सुरु असून त्यामुळे ऊसात राहणारे बिबटे शेताबाहेर पडत आहेत. तालुक्यात बिबट्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. सविता भीमराव वायसे (वय ३०, रा. माळेगाव.बीड) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, आज (रविवारी) पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास ऊसतोडणीसाठी काही महिला आणि पुरुष कामगार हिवरे खुर्द येथील जाधव मळ्यात गेले होते. ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याने अचानक सविता वायसे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अंधार असल्याने वायसे यांचा ट्रॅक्टरच्या लाईट्स लावून शोध घेण्यात आला. त्यावेळी नागरिकांना बिबट्या वायसे यांना घेऊन जाताना दिसला. त्यांनी तसाच ट्रॅक्टर बिबट्याच्या दिशेने ऊसात नेला. त्यामुळे बिबट्या वायसे यांना तिथेच सोडून पळाला. गंभीर जखमी झालेल्या वायसे यांना त्वरीत ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्या गंभीर जखमी असल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवर माहिती देऊन देखील त्यांच्याकडून दाखल न घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.