मावळ तालुक्यातील सांगवडे गावात ऊस तोडणी दरम्यान बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली आहेत. ही बाब आज सकाळी समोर आली असून त्यांना वनविभागाने तपासणी करीत ताब्यात घेतले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे, त्यांचा जन्म नुकताच दहा दिवसांपूर्वी झाला असावा असं वनविभागाकडून सांगण्यात आलं.

मावळ मधील सांगावडे गावातील जालिंदर लिमन यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. तेव्हा कामगारांना अवघ्या दहा दिवसांची बिबट्यांची पिल्ले आढळली. दरम्यान, यामुळे ऊसतोड कामगार भीतीच्या सावटाखाली आहेत. याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी येऊन अधिकारी आणि कर्मचारी यांनी पिल्लांची पाहणी करून त्यांना तपासणीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून गेल्या काही महिन्यांपासून सांगावडे गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याच गावकऱ्यांच म्हणणं होतं. ते या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. मावळ परिसरात अनेकदा बिबट्या असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याची माहिती मावळ वनविभागाला देण्यात आली होती. दरम्यान, जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने बिबट्या हे मानवीवस्तीकडे आणि शेताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अस ही आवाहन करण्यात येत आहे.