जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावात श्रीरामनगर शिवारात आज बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात वन विभागाला यश आले. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजनाबाई लामखडे या आपल्या वांग्याच्या शेतात पाणी भरत असताना त्यांना अचानकपणे बिबट्याचा बछड्याने दर्शन दिले. बिबट्याला पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थ आणि वनरक्षक दत्तात्रय फापाळे यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या बछड्याला पकडले. हा बछडा पाच ते सहा महिन्यांचा असून आजारी असल्याने त्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिवरे गावात तिघांवर बिबट्याने हल्ला केला होता. लोकेश्वर मळ्याजवळ बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण आहे.