नियमांच्या उल्लंघनामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका

पिंपरी: अडीच महिन्यांच्या टाळेबंदीनंतर उद्योगनगरीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, मोकळीक मिळताच नियम पायदळी तुडवण्याची मानसिकता शहरातील बहुतांश नागरिकांमध्ये दिसून येते. करोना रुग्णांची संख्या ८०० च्या घरात पोहोचली असताना सर्रास होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यशासनाने दिलेल्या सुधारित आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनेक सवलती जाहीर केल्या. त्यानुसार, अडीच महिन्यांपासून बंद असलेले शहरातील उद्योगधंदे सुरू झाले. पालिकेचे कामकाज सुरू झाले. शहरांतर्गत पीएमपीची वाहतूक सेवा (५० टक्के क्षमतेने) सुरू झाली. बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. सम-विषम विभागणी करून बहुतांश दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे आता शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने बाहेर पडू लागल्याने रस्त्यांवरील गर्दी वाढली आहे. करोनाविषयक आवश्यक खबरदारी मात्र नागरिकांकडून घेतली जात नसून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

रात्री नऊ ते सकाळी पाच या वेळेतील संचारबंदी फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. गर्दी टाळण्याचे आवाहन सातत्याने करूनही भाजीमंडई, बाजारपेठा तसेच दुकानांमध्ये गर्दी होताना दिसते. मध्यंतरी पिंपरी बाजारपेठ सुरू केल्यानंतर पाच दिवसांत पुन्हा बंद करावी लागली. त्या आधी एकदा गर्दी उसळल्याने लाठीमार करण्याची वेळ पोलिसांवर आली होती. मुखपट्टी वापरणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुखपट्टी न घालणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यास पालिकेने सुरुवात केली होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी दंडाची रक्कम ५०० ऐवजी २०० रुपये इतकीच ठेवली. कोणत्याही दंडाचे भय नागरिकांमध्ये दिसून येत नाही. सुरक्षित अंतर ठेवण्याच्या हेतूने दुचाकी वाहनांवर एक जण असणे आवश्यक असताना दोन तथा तीन प्रवासी दुचाकीवर जाताना दिसतात. तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये चालकासह तीन जण अपेक्षित असताना त्यापेक्षा अधिक प्रवासी आढळून येतात.

केशकर्तनालय चालक नाराज

पिंपरी पालिकेने केशकर्तनालये, सौंदर्य प्रसाधनगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, राज्य शासनाने त्यांच्यावरील निर्बंध कायम ठेवल्याने पालिकेने दिलेल्या परवानग्या रद्द केल्या. त्यामुळे ही दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. सर्व अटींचे पालन करून व्यवसाय करत असतानाही पुन्हा दुकाने बंद केल्याने या व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.