पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासदत्व मिळवून देण्याचा बहाणा करून कागदपत्रे आणि धनादेश घेत साहित्यप्रेमींची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. टाळेबंदीच्या कालखंडाचा लाभ उठविणाचा प्रयत्न करणाऱ्या वृत्तीचा शोध घेत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सभासद होऊ इच्छिणाऱ्यांचे आर्थिक नुकसान टळण्यापासून पायबंद घातला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची मुदत ३१ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, करोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करीत वार्षिक सभेमध्ये परिषदेच्या कार्यकारिणीने पाच वर्षांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवून बहुमताने मंजूर करून घेतला. टाळेबंदीच्या कालखंडाचा लाभ उठवून काही व्यक्ती आणि संस्था साहित्यप्रेमींकडून अर्ज भरून पैसे गोळा करीत असल्याचे उघडकीस आले.

परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होईल तेव्हा आपल्या हाती सूत्रे यावीत हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मतदारसंख्या वाढविण्याच्या उद्देशातून आजीव सभासद करून घेण्याची मोहीम काहीजण राबवीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शुल्क घेण्यात आलेल्या लोकांनी आजीव सभासदत्वाविषयी चौकशी करण्यासाठी दूरध्वनी केले तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यामुळे किती लोकांचे सभासद शुल्क घेतले हे अद्याप समजले नाही, असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. र्मिंलद जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावर आजीव सभासदत्वाचा अर्ज कोणालाही डाउनलोड करता येतो. या अर्जाच्या झेरॉक्स प्रती अनेकांना पाठवून सभासद शुल्क घेण्यात आले आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सभासद शुल्क धनादेश किंवा ऑनलाइन स्वरूपात नव्हे तर, रोख भरून घेण्याची सूचना परिषदेकडून बँकेला करण्यात आली आहे. – प्रा. र्मिंलद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literary lovers are deceived under the pretext of getting life membership akp
First published on: 22-07-2021 at 00:01 IST