मुकुंद संगोराम Mukund.sangoram@expressindia.com

पुणे शहर अनेक अर्थाने कमनशिबी आहे. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर या शहराला काकासाहेब गाडगीळांचा अपवाद वगळता राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व क्वचितच लाभले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याचा जो काही विकास झाला, त्याचे संपूर्ण श्रेय इथे राहणाऱ्या नागरिकांच्या उदंड इच्छाशक्तीला आणि कर्तृत्वाला द्यायला हवे. कोणत्याही राज्याची राजधानी नसलेले, खंबीर नेतृत्व नसलेले पुणे शहर तरीही जगाच्या नकाशावर आपले वेगळेपण टिकवून आहे. पुणेकरांची कल्पनाशक्ती आणि ऊर्जा यामुळे हे घडत आले, परंतु त्या विकासाला येणाऱ्या मर्यादा दूर करण्यासाठी आजवर कधीही सर्वपक्षीय नेते एकवटले नाहीत. त्यामुळे विमानतळ ही या शहराच्या विकासातील अतिशय गरजेची व्यवस्था आहे, याचे भानच एकाही राजकारण्याला येत नाही. गेले सुमारे वीस वर्षे पुणे शहरासाठी स्वतंत्र विमानतळ निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त चर्चा सुरू आहे. इतकी वर्षे कोणतेही शहर विकासापासून वंचित राहू शकत नाही, हे डोक्यातच न शिरणाऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगणे कुणाच्याही शक्तीबाहेरचे आहे. हे करंटेपण घेऊनच पुणे शहर विकास पावते आहे!

चाकणला विमानतळ होणार होणार, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा सगळ्यात आधी राजकारण्यांनी परिसरातील जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करायला सुरुवात केली. त्यांना विमानतळ होण्यापेक्षा जमिनीचे वाढवून मिळणारे भाव अधिक आकर्षित करत होते. पण फक्त चर्चाच होत राहिल्या. अमुक पक्षाच्या नेत्याने विमानतळ व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले रे केले की लगेच विरोधी पक्षाचा नेता बाह्य़ा सरसावून, ‘बघतोच कसे होते विमानतळ’, असे ओरडू लागला. तरी पुण्याचे नशीब, की येथे देशातील अतिशय महत्त्वाचा लष्करी तळ आहे, त्यामुळे लष्करासाठी का होईना एक विमानतळ आहे. मोठय़ा उदार मनाने लष्कराने त्याच विमानतळावरून नागरी वाहतुकीलाही परवानगी दिली, म्हणून काही प्रमाणात का होईना, विमान वाहतूक सुरू होऊ शकली. पण उद्योगांच्या वाढीसाठी, जगाच्या संपर्कात राहण्यासाठी या शहराला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ असायला हवे, हे कितीही ओरडून सांगितले, तरी राजकीय पटलावर फक्त बहिरेपणच साचून राहिले. किती हे करंटेपण!

चाकण येथे विमानतळ होणे लष्करी विमान वाहतुकीसाठी अयोग्य असल्याचे ठरल्यानंतर पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरू झाला. कोणत्याही मोकळ्या जागेत विमानतळ उभे करता येत नाही, हे न कळणाऱ्या राजकारण्यांना विमानतळ का नको, हे कळण्यापलीकडचे आहे. त्यामुळे चाकणनंतर पुरंदर येथील जागा योग्य असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांकडून मिळाला. आता तेथे विमानतळ होईल, अशा स्वप्नात असणाऱ्या पुणेकरांना गेली किमान पाच वर्षे फक्त चर्चाच ऐकू येते आहे. या जागेची निश्चिती होऊन तेथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार, असे कळल्याबरोबर त्यालाही विरोध सुरू झाला. हा विरोध केवळ राजकीय आहे. कारण आधीच्या सरकारने त्यासाठी केलेल्या हालचालीमुळे जर विमानतळ झालेच, तर त्याचे सारे श्रेय त्या पक्षाला जाईल. तसे होऊ नये, म्हणून विरोध. हा बावळटपणा आहे, की निर्लज्जपणा?

सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती एकवटण्याची गरज असताना, पुण्यातले राजकारणी डबक्यातले राजकारण करण्यात मश्गुल आहेत. आपण या शहराच्या भविष्याचे वाटोळे करतो आहोत, याची त्या बापडय़ांना कल्पनाही नाही. विरोधक आणि समर्थक या दोन्ही बाजूच्या राजकारण्यांच्या पुढच्या पिढय़ा समस्त पुणेकरांच्या साथीने या नादानीबद्दल त्यांना कधीही क्षमा करणार नाहीत. करंटेपणाची पण हद्द असते. पुणे शहराला कधीही विमानतळ मिळणार नाही, सबब हा नाद सोडून द्यावा, असा ठराव, सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येऊन करणे एवढेच आता शक्य आहे. आता पुरंदरपाठोपाठ पुन्हा पहिल्यापासून नव्या जागेचा शोध सुरू होईल, पुन्हा समर्थन आणि विरोध सुरू होईल.. हे असेच चालणार असेल, तर या शहराचे भविष्य कायमच काळवंडलेले राहणार. ज्यांनी ज्यांनी विरोध केला, त्यांची नावे काळ्या अक्षरात जागोजागी लावणे, एवढाच पर्याय आता उरला आहे.