प्रत्यक्ष गुरूसमोर सादर होणारी कला.. कलेकलेने रंग भरत जाणारे गायन आणि संतूरवादन.. रसिकांची टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेली दाद आणि शास्त्रीय सुरांनी सजलेली मैफल.. अशा उत्साही वातावरणात अभिजात संगिताचे भविष्य आमच्या हाती आहे, याची प्रचिती देणाऱ्या युवा कलाकारांनी बुधवारी गुरुवंदना अर्पण केली. पुणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पृथ्वी एडिफिस’ प्रस्तुत ‘लोकसत्ता-शागीर्द’ उपक्रम रंगला.
टिळक स्मारक मंदिराच्या आवारात कार्यक्रमापूर्वी तासभर आधीच रसिकांनी गर्दी केली होती. प्रेक्षागृहाबाहेर मोठी रांग लागली होती. अखेर टिळक स्मारक मंदिराची दारे लावून घेण्यात आली. त्यामुळे काही रसिकांना कार्यक्रमाचा आनंद न लुटताच परतावे लागले. पुणेकरांनी युवा कलाकारांच्या आविष्काराला त्याच समरसतेने दाद दिली. पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांच्या संतूरवादनाने पहिले सत्र रंगले. आलाप, जोड, झाला वादनातून त्यांनी ‘हंसध्वनी’ रागाचे सौंदर्य उलगडले. ताकाहिरो यांनी  विलंबित रूपक ताल, मध्यलय अद्दा ताल आणि द्रुत त्रितालातील गत खुलविल्या. नीलेश रणदिवे यांच्या तबला वादनाच्या साथीने त्यात रंग भरला. या मैफलीमध्ये संतूरवादनातील कशिदाकाम उलगडताना ताकाहिरो यांनी श्रोत्यांना तबला आणि संतूर जुगलबंदीचा आनंद दिला. रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत या युवा कलाकारांना मानवंदना दिली. किशोरीताईंची नात आणि शिष्या तेजश्री यांनी  ‘झिंझोटी’ रागाचे सौंदर्य उलगडले. रुपक तालातील ‘महादेव’ आणि द्रुत त्रितालातील ‘हे शिव गंगाधर’ या दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची, माधुर्य कुंवर यांनी तबल्याची आणि वनिता तांबोसकर यांनी तानपुऱ्याची साथ केली.

मुळातच संस्कार असले म्हणजे विषय येतो. पण, तेवढय़ानेच सारे येते असे नाही, तर साधनेतूनही लक्ष्यप्राप्ती करता येते. ज्ञान हे कधीच संपत नाही अशी भावना गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी ‘लोकसत्ता-शागीर्द’ कार्यक्रमांत बुधवारी व्यक्त केली.
पृथ्वी एडिफिस प्रस्तुत ‘लोकसत्ता-शागीर्द’ या कार्यक्रमात किशोरीताईंच्या शिष्या तेजश्री आमोणकर आणि ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई यांचा कलाविष्कार सादर झाला. आपल्या शिष्यांना आशीर्वाद देण्यासाठी हे दोन्ही दिग्गज गुरू उपस्थित होते. ‘पृथ्वी एडिफिस’चे व्यवस्थापकीय संचालक अभय केले, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यावेळी उपस्थित होते.
सर्वस्वी अधोगतीला चाललेल्या जगाला अभिजात विषयाचे पुनस्थापन करणे जिकिरीचे असते. त्यासाठी ‘लोकसत्ता’ने पाऊल टाकले आहे, यामध्ये त्यांना यश येवो अशी सदिच्छा व्यक्त करून किशोरीताई म्हणाल्या, ‘गुरू-शिष्य नाते चिरंतन आहे. माझ्या साधनेमध्ये प्रत्येक ठिकाणी मला माई (गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर) दिसते आणि मार्गदर्शन करते. गुरूप्रती केवळ व्यक्ती नव्हे तर ज्ञान म्हणून पाहिले पाहिजे. तेजश्री हिच्यावर माईच्या आणि माझ्या गाण्याचे संस्कार आहेत. साधना आणि गाणे यामध्ये फरक असतो. रागाचे चिरंतनत्व जपणे, ही अनुभूती देणे हा खरा अभ्यास आहे. या मुलांनी ज्ञानाचे पाय सोडू नयेत हीच त्यांची संथा आहे’’
– गानसरस्वती किशोरीताई आमोणकर
****
बंगला, गाडी, बँक बॅलन्स ही कलाकाराची संपत्ती नसते, तर आपला वारसदार म्हणजेच उत्तराधिकारी कोण हे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. अनेक वर्षांनंतर असा एखादा शिष्य सापडतो. ताकाहिरो हा भारतीय नाही, तर जपानी आहे. संतूर शिकण्यासाठी आपले घर आणि नोकरी सोडून तो मुंबईला आला. शागीर्द या उपक्रमासाठी माझ्या डोळ्यासमोर पहिले त्याचेच नाव आले.
– पं. शिवकुमार शर्मा