लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राज्यभरात गेल्या २० महिन्यांत ५१ अधिकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडे तब्बल १४५ कोटींची बेहिशेबी ‘माया’ मिळाली. यापैकी प्रथमश्रेणी दर्जाच्या नऊ अधिकाऱ्यांकडील बेहिशेबी मालमत्तेची एकूण बेरीज १३५ कोटी रुपये आहे!
एसीबीच्या आठ विभागांनी गेल्या वर्षी सर्व वर्गातील ३६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे तब्बल १२५ कोटी १८ लाख २२ हजार वीस रुपये किंमतीची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. या वर्षी सप्टेंबपर्यंत १५ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून १९ कोटी ८५ लाख १२ हजार बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये प्रथमश्रेणी अधिकाऱ्यांनीच ९० टक्के बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले. द्वितीयश्रेणीच्या सात अधिकाऱ्यांकडे सव्वातीन कोटींची माया आढळून आली. तर वर्ग तीनच्या ११ जणांकडे तीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळले.
गेल्या वर्षी एसीबीने महसूल विभागातील प्रथमश्रेणीच्या तीन अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल एक अब्ज दहा कोटींच्या आसपास मालमत्ता आढळून आली. त्यानंतर पोलीस खात्यातील प्रथमश्रेणीच्या दोन अधिकाऱ्यांकडे दोन कोटींची माया मिळाली. यंदाच्या वर्षांत बांधकाम खात्यातील एका प्रथमश्रेणी अधकाऱ्याकडे १४ कोटी ६६ लाख १७ हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.
पुणे विभागाचे ‘शतक’
गेल्या अकरा महिन्यांत एसीबीच्या पुणे विभागाने यशस्वी सापळे रचण्याची शतक पूर्ण केले आहे. पुणे विभागात लाच घेताना १४३ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून १७ लाख ६७ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. राज्यात सर्वाधिक सापळे पुणे विभागात रचण्यात आले आहेत. तसेच पुणे विभागातील २० अधिकाऱ्यांची उघड चौकशी सुरू आहे.