भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक झालेले व नंतर विधानसभा निवडणुकीत भोसरीतून अपक्ष आमदार झालेल्या महेश लांडगे यांनी गुरुवारी नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केला. लांडगे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रक्रियेतील पहिले पाऊल त्यांनी या राजीनाम्यातून टाकले.

भोसरी विधानसभेतून महेश लांडगे अपक्ष निवडून आले. नंतर त्यांनी भाजप प्रणीत राज्य सरकारला पािठबा दिला, मात्र नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नव्हता.राष्ट्रवादी-भाजपशी त्यांचा ‘तळय़ात-मळय़ात’चा खेळ बरेच दिवस सुरू होता. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. राजकीयदृष्टय़ा ‘योग्य मुहूर्त’ मिळत नसल्याने राष्ट्रवादीशी काडीमोड होत नव्हता म्हणून भाजपशी सोयरीकही होत नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी विशेष जवळीक असलेल्या लांडगे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश करायचा आहे. त्यादृष्टीने जुळवाजुळव सुरू असल्याचे भाजप वर्तुळातून सांगण्यात येते. भाजप प्रवेशापूर्वी त्यांना राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच नगरसेवकपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता पालिका मुख्यालयात येऊन त्यांनी आयुक्तांकडे राजीनामा दिला.

‘विनाअट’ भाजपमध्ये येणार

आमदार महेश लांडगे आज भाजपमध्ये येणार, उद्या येणार अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला दुजोरा देत भाजप खासदार अमर साबळे यांनी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत लांडगे यांचा लवकरच ‘विनाअट’ प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट केले. भाजप-शिवसेनेची युती होणारच, असा पुनरूच्चार करत प्रभागरचनेचा अभ्यास झाल्यानंतर दोन्हीकडील प्रमुख नेत्यांची लवकरच बैठक होणार असल्याचे साबळे यांनी सांगितले. निगडी-प्राधिकरण येथे खासदार साबळे यांच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. साबळे म्हणाले, की आमदार लांडगे यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांच्या काही अटी नाहीत. प्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल. भाजप प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. कारण, भाजपच सत्तेत येणार, याची सर्वाना खात्री वाटते आहे. शिवसेनेशी युती व्हावी, यासाठी भाजपकडून प्रथम प्रस्ताव देण्यात आला होता. यासंदर्भातील पुढील बैठक लवकरच होणार आहे.