पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात सायकल शेअरिंगचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. हा विषय मंजूर होऊ नये, यासाठी शिवसेनेकडून सभागृहातून मानदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बहुमताच्या जोरावर भाजपने प्रस्तावाला मंजुरी दिली. सत्ताधाऱ्यांच्या सायकल शेअरिंग योजनेला विरोध दर्शवण्यासाठी सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे, महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव यांनी सभागृहात सायकली आणल्या होत्या. महापौर मुक्ता टिळक यांनी सायकली बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर सायकली बाहेर आणण्यात आल्या.

या सर्व घडामोडीनंतर काँग्रेसच गटनेते अरविंद शिंदे यांनी पाणी योजनेच्या सल्लागार कंपनीवर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, ही खास सभा असल्याचे सांगत दुसऱ्या विषयावर चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले. सायकल शेअरिंग योजनेसंदर्भात प्रशासन आणि भाजपकडून योग्य प्रकारे खुलासा होत नसल्याने विरोधकांनी महापौरांना घेरावा घातला. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी महापौरांसमोरचा मानदंड पळवला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी त्यांच्या हातून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या नगरसेवकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाचा विरोध कायम असताना महापौर मुक्ता टिळक यांनी मतदान घेण्याचे आदेश दिले. बहुमताने सायकल शेअरिंगची योजना मंजूर करण्यात आली. या निर्णयावर विरोधक भाजप विरोधात घोषणाबाजी करत सभागृहातून बाहेर पडले.