अभिनेते मकरंद अनासपुरे यांची भावना

समाजातील विविध गोष्टींवर कुणालाही न दुखवता उपरोधिक भाष्य हे विनोदी कलाकाराचे काम असते. रसिकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच  माझ्यासारख्या विनोदी कलाकाराचे पुंजी असते, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

राजा गोसावी प्रतिष्ठानतर्फे राजा गोसावी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते अनासपुरे यांना विनोदाचा बादशहा पुरस्काराने गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, माजी आमदार प्रकाश देवळे, डॉ. प्रसाद खंडागळे, विदुला गोसावी, दिलीप हांडे या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात राजा गोसावी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अवघाची संसार’ चित्रपट दाखविण्यात आला.

विलक्षण प्रतिभेचा कलाकार आणि विनोदाचा बाहशहा सतीश तारे यांच्या स्मृतीला हा पुरस्कार अर्पण करतो, असे सांगून अनासपुरे म्हणाले, कोणताही पुरस्कार वैयक्तिक नसतो. मला घडण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वाचा हा पुरस्कार आहे. प्रतिकूल परिस्थितीत राजाभाऊ यांनी अभिनयाच्या जोरावर आपले विश्व निर्माण केले. गोखले म्हणाले, बबन प्रभू, आत्माराम भेंडे, राजाभाऊ  परांजपे, राजा गोसावी असे समर्थ विनोदी नट मी पाहिले.

या प्रत्येकाच्या विनोदाची जातकुळी वेगळी होती. सर्वाच्या विनोदाचा जवळून अभ्यास केला. अभिनय इतका खोटा करायचा की तो खरा वाटला पाहिजे. मनातून दु:ख असलेला कलाकार लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो. त्यामुळे या सर्व विनोदसम्राटांना मी मनापासून सलाम करतो.