पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारामध्ये ‘पुणे’ लावावे की नाही अशा वादात न पडता, विद्यापीठाच्या अधिसभेने मंजूर केलेला ठराव लवकरात लवकर संमत कसा होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी सांगितले.
पुण्यात झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी हे वक्तव्य केले. पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत सध्या वाद सुरू आहे. विद्यापीठाच्या अधिसभेने पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करून ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव करण्यात यावे असा ठराव नुकताच संमत केला होता. त्याबाबत विद्यापीठाच्या नावामध्ये ‘पुणे’ नको अशी मागणी काही संघटनांनी केली होती.
या पाश्र्वभूमीवर भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारामध्ये अडथळे निर्माण करणारे अनेक घटक आहेत. विद्यापीठाच्या अधिसभेने नामविस्ताराचा ठराव मंजूर केल्यामुळे आता विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत महत्त्वाचा टप्पा आपण गाठला आहे. मात्र, आता हा ठराव पुढे नेऊन त्याची पूर्तता कशी होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याबाबत प्रयत्न न करता वाद घातल्यास विरोधक नामविस्ताराचा प्रश्न रेंगाळत ठेवतील. आमचे काही मित्रच पुणे विद्यापीठाचे नाव काढून टाकण्याची मागणी करत आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधूनही ‘मराठवाडा’ काढून टाकण्याचा आग्रह धरण्यात आला नव्हता. त्यामुळे या वादात न पडता नामविस्ताराचा प्रश्न कसा मार्गी लागेल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.’’