नुकत्याच घडून गेलेल्या माळीण दुर्घटनेची छाप गणेशोत्सवावर दिसत आहे. गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणेशोत्सवातही माळीण दुर्घटनेचा विषय हाताळण्यात आला आहे.
महिन्यापूर्वी आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून संपूर्ण गावच नष्ट झाले. त्या घटनेचे पडसाद यावर्षीच्या गणेशोत्सवांमध्येही दिसत आहेत. काही मंडळांनी माळीणमधील दुर्घटनेचा संदर्भ घेऊन देखावे सादर केले आहेत. माळीण मधील दुर्घटना काय होती, अशा प्रकारच्या दुर्घटना का होतात यांची माहिती या देखाव्यांमधून देण्यात आली आहे. पुनर्वसनाला मदत करण्यासाठी आवाहनही करण्यात आले आहे. लोहगाव येथील शिवाजीराजे मित्रमंडळाने माळीण दुर्घटनेचे भीषण स्वरूप देखाव्याच्या माध्यमातून समोर आणले आहे. या मंडळातील १२ ते २५ वर्षे वयोगटातील कार्यकर्त्यांनी हा देखावा साकारला आहे. दरवर्षी गणेशोत्सवातील सजावटीवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. वाचलेले पैसे आणि नागरिकांना आवाहन करून त्यातून मिळालेला निधीही माळीणच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे. अनंतचतुर्दशीच्या दिवशी हा निधी शासनाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. पिंपरी-चिंचवड भागातील काळेवाडी येथेही ‘माळीण’ या विषयावरील देखावा करण्यात आला आहे. तेथील तापकीरनगरमधील तापकीरनगर मित्र मंडळाने दुर्घटनेच्या आधीचे डोंगरकुशीत वसलेले माळीण गाव यावर ‘एक होते माळीण गाव’ हा देखावा सादर केला आहे.
मंडळांबरोबरच घरगुतीस्वरूपात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातही माळीण दुर्घटनेचा देखावा उभारण्यात आला आहे. शनिवार पेठेतील संजय तांबोळी यांनी माळीण दुर्घटनाग्रस्तांना श्रद्धांजली म्हणून हा देखावा उभारल्याचे सांगितले. पुनर्वसन झालेले माळीण कसे असेल, त्याचे चित्र तांबोळी यांनी उभे केले आहे. शेतकऱ्याच्या वेशातील गणपती माळीणच्या गावातील पाश्र्वभूमीवर दाखवण्यात आला आहे. गणेशोत्सवात दरवर्षी आजूबाजूच्या मुलांना एकत्र करून देखावा उभा करत असल्याचे आणि मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.