News Flash

माळशेज घाटातील हिरवाईवर विकृत पर्यटकांचा ताबा!

पुण्याच्या परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळे सर्वसामान्य पर्यटकांसाठी उरलेली नाहीत. ती केवळ दारुडे, बेदरकार, धिंगाणा करणारे व गोंधळ घालणाऱ्यांसाठीच उरली आहेत. त्यावर प्रकाश टाकणारी मालिका...

माळशेज घाटातील हिरवाईवर विकृत पर्यटकांचा ताबा!

माळशेज घाट म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या मुसळधार सरी, दाट धुके, उत्तुंग कडे, पावसाने न्हाऊन निघालेले काळे भिन्न कडे, भन्नाट वारे, आकर्षित करणारी हिरवाई अन् मधून डोकं वर काढून वाऱ्यावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले.. पण आता या वातावरणाचा आनंद उपभोगताना अनेक विकृत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. रस्त्यावर-धबधब्यांमध्ये बसून दारू पिणे, धिंगाणा-गोंधळ घालणे, अश्लिल चाळे-छेडछाड, बेदरकार वाहन चालविणे, त्यातून होणारे अपघात अशा गोष्टींमुळे हे ठिकाण शांत, सुसंस्कृत पर्यटकांसाठी उपद्रव ठरले आहे. वाहतुकीची कोंडी व सुरक्षितता हे मुद्देसुद्धा यामुळे ऐरणीवर आले आहेत.
पावसाळी पर्यटन आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटाचा परिसर उत्तम आहे. येथील धो-धो पाऊस, जागोजागी निर्माण होणारे धबधबे, दाट धुके आणि हिरवाई यामुळे तिथे पावसाळ्यात मोठी गर्दी होते. विशेषत: शनिवार, रविवार आणि इतर सुट्टय़ांच्या दिवशी येथे मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. कल्याण, मुरबाड, ठाणे, मुंबई, नगर, पुणे येथून स्वत:ची वाहने घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. पण आता त्याचा ताबा विकृत पर्यटकांनी घेतला आहे. ‘मज्जा’ आणि धांगडिधगा एवढय़ाच गोष्टी तेथे पाहायला मिळतात. गेल्याच शनिवारी-रविवारी या वर्षीच्या हंगामाला सुरुवात झाली.
यातील अनेक पर्यटक दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू याची नशा करणे, मोठय़ा आवाजात गाणी वाजवणे असे प्रकार करतात तसेच, तोकडय़ा वस्त्रांनिशी इतरांना लाज वाटावी असे चाळे करताना दिसतात. दारू प्यायल्यावर तिथेच बाटल्या फोडणे, त्या दरीत टाकणे, अचकट-विचकट हावभाव करणे, अश्लिल नाच करणे अशा अनेक गोष्टींचा त्रास स्थानिकांना, निसर्गप्रेमींना तसेच  मुख्यत: कुटुंबांसह फिरायला आलेल्या पर्यटकांना सहन करावा लागतो. अशा वेळी तेथे पोलिसांचा बंदोबस्त असावा आणि त्यांनी गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा अनेक पर्यटकांनी व्यक्त केली.
नुकताच घडलेला प्रसंग…
गेल्याच रविवारची घटना (२० जुलै). मुंबई येथील चार तरुण माळशेज घाटात इन्होवा मोटारीतून (एम.एच.०४/ डी. आर. ६७८१) आले होते. माळशेज घाटात दारू प्यायल्यानंतर ते नारायणगाव येथे आले. तेथील एका हॉटेलात पुन्हा दारू प्यायले. ते बसस्थानकाजवळ असलेल्या लॉजकडे चालले होते. त्या वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला त्यांनी धडक दिली. त्यात ट्रॅक्टर उलटला. ड्रायव्हरने उडी मारल्याने तो बचावला. मात्र, ट्रॉलीत बसलेल्या दोन महिला मजूर खाली पडल्या. एकीला गंभीर इजा झाली. अपघातानंतर मोटारीतील दोन तरुण पळून गेले. मद्यधुंद अवस्थेतील इतर दोघांना चालताही येत नव्हते. त्यांना नागरिकांनी चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले.
‘आनंद की मज्जा?’
माळशेजमध्ये आल्यानंतर येथे मिळणारा आनंद जीवनाला अर्थ प्राप्त करून देतो. अचकट, विचकट चाळे करून ‘मज्जा’ करायची की समजून उमजून भटकंती करायची हे ठरवायला हवे.
– सुभाष कुचिक व राजकुमार डोंगरे (स्थानिक पर्यावरण अभ्यासक)
‘ऐंशी टक्के पर्यटक मद्यधुंद’
माळशेजचा भाग ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. पोलीस बंदोबस्ताला येतात. त्यांच्या हद्दीत चेक नाका आहे, तरीदेखील तरुण मुले-मुली दारू पिऊन येतात आणि धिंगाणा करतात. येथे आलेले ८० टक्के पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असतात. येथे मुंबईकडून जास्त पर्यटक येतात. दारू प्यायलेल्या तरुणांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. माळशेज येथे दोन्ही पायथ्याशी स्पीडब्रेकर आवश्यक आहेत. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा पत्र देऊन देखील स्पीडब्रेकर केलेले नाहीत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. माळशेजमधील आमच्या हद्दीपर्यंत आमचा एक जमादार आणि चार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी असतात.
– टी.वाय. मुजावर (सहायक पोलीस निरीक्षक, ओतूर पोलीस ठाणे)
‘वाहनचालकांना त्रास’
मुंबईला तरकारी घेऊन जाणाऱ्या वाहनांना मद्यधुंद पर्यटकांचा मोठा त्रास होतो. मद्यधुंद अवस्थेत पर्यटक वाहनांसमोर नाचत बसतात. त्यामुळे आमची वाहने माळशेज घाटातून लवकर बाहेर पडत नाहीत. अनेकदा पर्यटक आणि वाहनचालक यांच्यात भांडणे होतात.
– देवेंद्र कोरहाळे (नारायणगाव येथील ट्रान्सपोर्ट मालक)
‘रोजगार मिळाला पण..’
माळशेजमध्ये येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला, पण त्यांचा त्रास मोठा आहे. मद्यधुंद अवस्थेतील तरुण-तरुणींचा नाच, अश्लिलपणा, धांगडिधगा न पाहण्याजोगा असतो. वाहनांची बेशिस्त, तरुणांची अरेरावी त्रासदायक आहे.
– आशिष जगताप (बनकर फाटा येथील व्यावसायिक)
माळशेज घाटाची वैशिष्टय़े-
भात शेती व पाण्याने तुडुंब भरलेली भातखाचरे
हिरव्या गवतांचे गालीचे, त्यातून डोकावणारी रानफुले
छोटय़ा धबधब्यांपासून ते प्रचंड मोठे धबधबे
दरीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे उलट दिशेमुळे ‘उलटे धबधबे’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2014 3:30 am

Web Title: malshej ghat tourist liquor traffic jam visitor
टॅग : Malshej Ghat
Next Stories
1 चौतीस गावांमध्ये एफएसआयची लयलूट
2 बांधकाम परवानग्या थांबवा; मुख्यमंत्र्यांना आज निवेदन देणार
3 प्रवेश प्रक्रियेचे नियम संघटनांना ‘जाचक’
Just Now!
X