पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील एका डॉक्टरच्या मुलाला एका गुन्ह्यतून सोडविण्याचा बहाणा करून डॉक्टरांकडून ७५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्याला खंडणीविरोधी पथकाने मुंबईतील घाटकोपर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून पाच लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या खंडणीत घेतलेली रक्कम कोणाकोणास दिली, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीला पाच मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चौकशीमध्ये या गुन्ह्यत सहभागी असलेल्या इतरांची नावे पुढे येऊ शकणार आहेत.

मनोज तुकाराम अडसूळ ऊर्फ अत्रे (वय ४८, रा. मीरा सोसायटी, सॅलिसबरी पार्क) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय ६९, रा. जयदीप बंगला, शाहू महाविद्यालय रस्ता, पर्वती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १८ ऑक्टोबर २०१९ ते ६ फेब्रुवारी २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. याबाबत ९ फेब्रुवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी अडसूळ याने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यापासून तो फरार होता. या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत. अडसूळ हा घाटकोपर येथे त्याच्या मित्राच्या घरी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर असून, त्यात त्याला कोणी मदत केली आहे का, अशा प्रकारे आणखी कोणाकडून त्याचे खंडणी उकळली. त्याचप्रमाणे या गुन्ह्यत घेतलेले पैसे त्याने आणखी कोणाला दिले. या गुन्ह्यतील दुसरा आरोपी जयेश कासट याच्यासोबत त्याचे संबंध काय? आदी गोष्टींचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

खंडणी कशासाठी?

खंडणीच्या प्रकरणातील फिर्यादी डॉ. दीपक प्रभाकर रासने यांच्या डॉक्टर मुलावर १८ ऑक्टोबर २०१९ रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यमध्ये त्याला ३ ते १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी भीती आरोपी मनोज अडसूळ याने डॉ. रासने यांना दाखवली. अटकेचा बनाव देखील करण्यात आला. हे प्रकरण मिटवायचे असल्यास १ कोटी ३० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी अडसूळ याने रासने यांच्याकडे केली. त्यापैकी ५४ लाख रुपये धनादेशाद्वारे, तर २१ लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारले. धनादेशाद्वारे घेतलेले ५४ लाख रुपये अडसूळ याने इतर काही जणांना दिले.