शनिवार रात्री अकराची घटना; गुन्हा दाखल करण्याच काम सुरू
पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत बाहेर फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने पिस्तूलातून गोळीबार केला आहे. या घटनेत तरुण गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आनंद ललीतकुमार सोलंकी वय- 30 रा. जुनी सांगवी, असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपाच्या परिसरात जखमी तरुण आनंद, पत्नी आणि शेजाऱ्याची लहान तीन वर्षीय मुलगी असे तिघे जण बाहेर फिसरण्यासाठी आले होते. पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने जवळून पिस्तूलातून आनंद च्या दिशेने गोळी झाडली यात आनंद च्या मानेला गोळी लागली असून गंभीर दुखापत झाली आहे. अद्याप, गोळीबार करण्याचं कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याच काम सांगवी पोलीस ठाण्यात सुरू आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. रात्री उशिरा पर्यंत ते पोलीस ठाण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 3:54 am