पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रात्री नऊ वाजता घरातील दिवे बंद न के ल्याच्या कारणावरून एरंडवणे येथे राहणाऱ्या सिद्धार्थ प्रभुणे यांना एका बांधकाम व्यावसायिकाने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या बांधकाम व्यावसायिकाने त्यांना धमकावत ‘देशद्रोही’ असल्याची टिप्पणी के ल्याचे सिद्धार्थ प्रभुणे यांचे म्हणणे आहे.

देशातील नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी रविवारी रात्री घरातील दिवे घालवून खिडकीत, गच्चीत मेणबत्या, पणत्या, मोबाईल फ्लॅश लावण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. मात्र, आजारी असल्याने सिद्धार्थ प्रभुणे त्यांच्या इमारतीच्या गच्चीत गप्पा मारत बसले होते. त्यांच्या घरातील दिवे सुरू होते. त्या वेळी समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने आरडाओरडा करून त्यांना दिवे घालवण्यास सांगितले. तसेच ‘तुमची पोलिसात तक्रार देऊन तुम्हाला तुरुंगात  पाठवतो, हे भारत माता की जय कधीच म्हणणार नाहीत, देशद्रोही आहेत,’ अशी टिप्पणी के ली. ‘दिवे घालवणे ऐच्छिक असूनही दादागिरी करणे चुकीचे होते, पण आम्ही हा प्रकार वाढवू इच्छित नाही. पोलिसात तक्रार न देण्याचे ठरवले आहे,’ असे सिद्धार्थ प्रभुणे यांची पत्नी तृप्ती यांनी सांगितले.