पीएमपीला निधी देण्याचा विषय आला की नगरसेवक त्याला नाहक खर्च म्हणतात; पण महापालिकेत अनेक कामांवर नाहक खर्च होतो, त्याकडे मात्र ते लक्ष देत नाहीत, अशी टीका ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी शनिवारी केली. पीएमपी सर्व दृष्टीने सक्षम होणे पुणे शहरासाठी आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
पीएमपीच्या टप्पा (स्टेज) पद्धतीमुळे कमी अंतरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाचा मोठा भरुदड पडत आहे. हा भरुदड पडू नये, यासाठी पाच रुपयात पाच किलोमीटर अशी मागणी पुण्यातील सव्वीस स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन केली आहे. या मागणीसाठी शनिवारपासून जनमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी तेंडुलकर बोलत होते. पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, राष्ट्र सेवा दलाचे सुभाष वारे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. महापालिका बसस्थानकापासून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
 शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम असणे ही पुण्याची गरज आहे. पीएमपी तोटय़ात आहे म्हणून नगरसेवक ओरड करतात. पीएमपीवरील खर्च त्यांना नाहक खर्च वाटतो; पण महापालिकेत कितीतरी ठिकाणी नाहक खर्च होत असतो, त्याकडे नगरसेवक का लक्ष देत नाहीत, अशी विचारणा या वेळी तेंडुलकर यांनी केली. पीएमपी आज तोटय़ात असली, तरीही ती सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यकच आहे, असेही ते म्हणाले. टप्पा पद्धतीमुळे पीएमपी प्रवाशांना भरुदड पडत असून एक ते दोन किलोमीटरसाठी दहा रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. म्हणून टप्पा पद्धत रद्द व्हावी यासाठी अभियान सुरू करण्यात आल्याचे राठी यांनी सांगितले. संस्थांच्या कार्यकर्त्यांनी या वेळी जनजागृती करणारी पत्रके बसस्थानकामध्ये वाटली.