कोकणातून आंब्यांची तुरळक आवक सुरू

बाजारात रत्नागिरी हापूसची आवक तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे. गुढी पाडव्यानंतर हापूस आंब्यांची आवक वाढणार आहे. दरम्यान, कर्नाटकातील आंबाही बाजारात दाखल झाला आहे.

थंडी कमी झाल्यानंतर उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. उष्मा वाढल्यानंतर फळ परिपक्व होते आणि आंब्यांची आवक वाढते. मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या कोकणातून हापूसची तुरळक आवक होत आहे.

कर्नाटकातील बदामी, तोतापुरी, लालबाग या जातीचे आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पुढील महिन्यात एक एप्रिलपासून हापूस तसेच कर्नाटक आंब्यांची आवक आणखी वाढेल. गुढी पाडव्याच्या दिवशी आंब्याची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होते.

मार्केट यार्डातील फळबाजारात कर्नाटकातील हापूसची दररोज १०० पेटय़ांची आवक होत आहे. तसेच बदामी, तोतापुरी, लालबाग, मलिका या जातीच्या आंब्यांची दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. या जातीच्या आंब्यांची विक्री प्रतिकिलोने होते. सध्या होत असलेली आवक तुरळक आहे. दक्षिणेतील आंब्यांची आवक एप्रिल महिन्यापासून वाढेल. त्यानंतर कर्नाटक हापूसचे दर कमी होतील, अशी माहिती फळबाजारातील आंबा व्यापारी आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते संघटनेचे पदाधिकारी रोहन उरसळ यांनी दिली.

कर्नाटक आंब्यांचे दर

कर्नाटक हापूस- ६०० ते ९०० रुपये डझन   (घाऊक दर)

बदामी- ५० ते ७० रुपये किलो

लालबाग-४० ते ६० रुपये किलो

तोतापुरी-५० ते ७० रुपये किलो

मल्लिका-६० ते ७० रुपये किलो

गुढी पाडव्यानंतर रत्नागिरी हापूसची आवक वाढेल. सध्या बाजारात हापूसच्या अडीचशे ते तीनशे पेटींची आवक होत आहे. पाडव्यानंतर ही आवक वाढत जाईल. सध्या बाजारात हापूसच्या चार ते आठ डझनांच्या पेटीचा भाव २५०० ते ४५०० रुपये दरम्यान आहे.

-अरविंद मोरे, आंबा व्यापारी