महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या हीरकमहोत्सवी वर्षांमध्ये राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही दोन महत्त्वाची मंडळे पुनर्रचनेसाठी वर्षभरानंतरही प्रतीक्षा यादीमध्येच आहेत. या मंडळांची पुनर्रचना केव्हा होणार, असा प्रश्न साहित्य क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.

मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपद रिक्त आहे. या नेमणुकांसह दोन्ही मंडळांची पुनर्रचना केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित करणारे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांना लिहिले आहे.

राज्यातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रशासकीय पातळीवरील शक्य तेवढीच कामे मंडळ करत आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला समजून घेणाऱ्या साहित्यिकाची अध्यक्षपदी नेमणूक व्हावी. तसेच राज्यातील वेगवेगळे विभाग, प्रवाह, भाषा, साहित्य, संस्कृती क्षेत्रांचे संस्थात्मक प्रतिनिधित्व करणारे विद्वान आणि कार्यकर्ते यांच्यातून प्रातिनिधिक सदस्यांची तातडीने या दोन्ही मंडळांवर नियुक्ती करावी, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

राज्यातील सरकारमध्ये बदल झाल्यानंतर डॉ. सदानंद मोरे यांनी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर दिलीप करंबेळकर यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्याच्या स्वीकृतीसंदर्भात ३० जुलै रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात पुढे काहीच कार्यवाही न झाल्याने पत्राद्वारे सरकारला आठवण करून दिल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. मराठीसंदर्भातील विविध प्रकल्पांना पुन्हा चालना मिळावी, यासाठी मंडळांची पुनर्रचना लवकर केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मी जानेवारीमध्येच विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मंडळाच्या पुनर्रचनेबाबत सरकारने काय ठरविले आहे याची मला कल्पना नाही.

– दिलीप करंबेळकर, माजी अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ

राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना केली नसल्यामुळे सरकार या विषयामध्ये गंभीर नाही. यासंदर्भात लवकर निर्णय घेतले पाहिजेत.

– विनोद तावडे, माजी सांस्कृतिक आणि मराठी भाषाविभाग मंत्री

करोनामुळे मागचे काही महिने टाळेबंदी असल्याने अडचणीचे गेले. परंतु आता कामांना गती आली आहे. सर्वच मंडळे आणि महामंडळांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाच्या नियुक्त्या होतील.

– सुभाष देसाई, मंत्री, मराठी भाषा विभाग