यंदाचा मार्च महिना गेल्या अकरा वर्षांतील सर्वांत उष्ण ठरला आहे. या वर्षी मार्चमध्ये सरासरी तापमानाच्या १.४ अंश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद झाली. तसेच गेल्या १२१ वर्षांतील तिसऱ्यांदा मार्चमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे समोर आले आहे.

हवामान विभागाकडे गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळातील तापमानाच्या नोंदी आहेत. त्यातील १९८१ ते २०१०च्या नोंदींचा आढावा घेतला असता सर्वसाधारणपणे मार्चमध्ये सरासरी तापमान ३१.२४ डिग्री सेल्सियस, किमान १८.८७ अंश सेल्सियस असते. मात्र यंदा मार्चमध्ये कमाल ३२.६५ अंश सेल्सियस, किमान १९.९५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मार्चमधील तापमान गेल्या अकरा वर्षांत सर्वाधिक ठरले आहे. तसेच गेल्या १२१ वर्षांत तिसऱ्यांदा मार्चमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. या पूर्वी २०१०मध्ये ३३.९ अंश सेल्सियस आणि २००४ मध्ये ३२.८२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. यंदा मार्चमध्ये देशभरातील काही भागांमध्ये ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान होते. तसेच २९ ते ३१ मार्चदरम्यान काही ठिकाणी उष्णतेची लाटही आली होती, अशी माहिती हवामान विभागाने दिली. देशभरातच मार्चमध्ये सरासरीच्या तुलनेत तापमान जास्त होते. त्यामुळेच विविध भागात कडकडीत ऊन आणि उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागल्याचे स्पष्ट होत आहे.

एप्रिलमध्येही पारा चढाच…

मार्चप्रमाणे एप्रिलमध्येही कमाल आणि किमान तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा सहन कराव्या लागणार आहेत.

तापमानवाढीची प्रमुख कारणे

जागतिक तापमानवाढ, मार्चमधील निरभ्र आकाशामुळे थेट पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांची वाढलेली तीव्रता, किनारपट्टी भागात वातावरणातील कमी झालेले बाष्प ही तापमानवाढीची काही प्रमुख कारणे असल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले.