एक दिवसावर येऊन ठेपलेल्या विजयादशमीनिमित्त बाजारात झेंडूची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांसह घरगुती ग्राहक फुलांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत आहेत. शेवंतीसह झेंडूच्या फुलांना मागणी जास्त आहे. मागणीच्या तुलनेत आवक समाधानकारक असल्याने सर्वच फुलांना चांगला दर मिळत आहे.

गणेशोत्सवात आवक पाहता मागणी कमी असल्याने झेंडूचे दर कोसळले होते. जिल्ह्य़ासह राज्यातील विविध भागातून मोठय़ा प्रमाणावर झेंडूची आवक होते. वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी झेंडूची फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र, विजयादशमीला फुलांच्या खरेदीसाठी बाजार फुलला आहे.

रविवारी झेंडूसह शेवंतीच्या फुलांची चांगली आवक झाल्याने शहराच्या विविध भागातील व्यापाऱ्यांनी फुलांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. याबाबत बोलताना फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले,की किरकोळ व्यापाऱ्यांसह घरगुती ग्राहकांकडून झेंडूसह शेवंतीच्या फुलांना मागणी आहे.

झेंडूच्या फुलांना प्रतिकिलोस वीस ते साठ रुपये तर शेवंतीला १६० ते अडीचशे रुपये दर मिळाला आहे. सोलापूर, वाई, सातारा, पुरंदर येथून झेंडूची आवक झाली. पावसामुळे खराब मालाची मोठी आवक झाल्याने दर कमी मिळाला, तर चांगल्या प्रतीच्या फुलांना अधिक दर मिळाला. सोमवारी मध्यरात्रीपासून फुलांची आवक वाढण्यास सुरुवात होईल. आवक वाढल्यास फुलांचे दर आणखी खाली येतील.

पुण्याच्या बाजारात कोकण, मुंबई, पनवेल येथील व्यापारी फुलांच्या खरेदीसाठी आले होते. यंदा पांढऱ्या रंगाच्या शेवंतीच्या फुलांना जास्त मागणी आहे. मात्र, शेवंतीची आवक कमी झाली आहे. रविवारी अनेक शेतकऱ्यांनी मार्केटयार्डाच्या बाहेर स्वत फुलांची विक्री केली.