राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणी, छायाप्रत आणि स्थलांतर प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर दहा दिवसांत विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन, छायाप्रत, गुणपडताळणी आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाकडून दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्चदरम्यान आणि बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. करोना विषाणू संसर्गामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात किंवा विभागीय मंडळात जाता येणार नाही. तसेच संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने ऑनलाइन पद्धतीचा  वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी  https://varification.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळाद्वारे, तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी https://varification.mh-hsc.ac.in/ या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आणि या प्रक्रियेसाठीचे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे.