काही वर्षांपूर्वी वधू-वर सूचक मंडळ आणि नातेवाइकांच्या माध्यमातून विवाह जुळवले जायचे. सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळेच की काय विवाहनोंदणीसाठी संकेतस्थळांचा वापर केला जात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांचे विवाह जुळवले आहेत आणि त्यांचे संसार अतिशय उत्तम सुरु आहेत. मात्र, अशा संकेतस्थळांवर विवाहेच्छुंची फसवणूक करणाऱ्या चोरटय़ांनीही शिरकाव केला आहे. बनावट प्रोफाईल तयार करून फसवणुकीचे उद्योग करणारे हे चोरटे विवाहेच्छु महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याकडून पैसे उकळतात. अशा प्रकरणात फसवणूक झाली तरीही बहुतेक महिला तक्रारदेखील करत नाहीत. तक्रार आली आणि तपास योग्यरीत्या झाला तर विवाहनोंदणी संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणूक करणारे हे चोरटे पकडले जातात; पण काही काळानंतर संकेतस्थळावर अशी फसवेगिरी करणारे चोरटे पुन्हा सक्रिय होतात. कारण ऐशोरामात जगण्याची सवय लागलेल्या या चोरटयांच्या दृष्टीने विवाहनोंदणी संकेतस्थळ हे फसवणूक करण्याचा धंदा बनले आहे. महिलांची फसवणूक करणाऱ्या एकाला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने धायरीतील डीएसके विश्व सोसायटीत सापळा लावून पकडले. तेव्हा त्याने विवाहनोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून सात महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार नऱ्हे भागातील एका महिलेने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. या तक्रारीचा तपास करताना पोलिसांनी रवींद्र सुधाकर कुलकर्णी (वय ५०, रा. डीएसके विश्व, सायंतारा, धायरी) याला अटक केली. तक्रारदार महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाले होते. ती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस आहे. त्या महिलेने एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर तिची माहिती दिली होती. काही महिन्यांपूर्वी कुलकर्णीने त्या महिलेशी संपर्क साधला होता. संपर्क साधून त्याने तो सिंगापूर येथील एका कंपनीत अधिकारी असल्याची बतावणी केली होती. विवाहानंतर सिंगापूरमध्ये स्थायिक व्हावे लागेल, असेही त्याने तिला सांगितले होते. त्याने दाखवलेल्या आमिषाला ही महिला बळी पडली. त्यानंतर त्याने वेळोवेळी त्या महिलेकडून पैसे घेतले. ही रक्कम १५ लाख ६९ हजार रुपये एवढी आहे. तसेच मंगळसूत्रही घेतले. त्यानंतर महिलेने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने विवाहासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने त्या महिलेने केलेल्या दूरध्वनींना प्रतिसाद देणे बंद केले. कुलकर्णी त्या महिलेला टाळू लागला. त्यानंतर अखेर फसवणूक  झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.

तक्रार आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्य़ाचा तपास करण्यास सुरुवात झाली. सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी हा तपास कसा कसा करण्यात आला त्याची माहिती सांगितली. ज्या संकेतस्थळावरुन महिलेची फसवणूक झाली होती, त्याची पडताळणी करण्यात आली. कुलकर्णीने संकेतस्थळावर टाकलेले छायाचित्र, दूरध्वनी क्रमांक आणि त्याच्या पत्त्याची पडताळणी करण्यात आली. तेव्हा कुलकर्णीने संकेतस्थळावर दिलेले मोबाईल क्रमांक बंद होते. त्याने दिलेल्या पत्त्याची पडताळणी करण्यात आली, तेव्हा तो तेथे राहत नसल्याचे निदर्शनास आले. काही वर्षांपूर्वी तो सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा भागात राहत होता. तेथील घरदेखील त्याने बदललेले होते. पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली, तेव्हा फारशी माहिती मिळाली नाही. कुलकर्णीने दोन विवाह केले होते. त्यापैकी पहिल्या पत्नीबरोबर त्याने घटस्फोट घेतला होता. त्याआधारे पोलिसांनी त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांना कुलकर्णीच्या ठावठिकाणाची माहिती मिळाली आणि पुढे शोध सुरू झाला.

कुलकर्णी शक्यतो भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन राहायचा. तो राहण्याची ठिकाणे कायम बदलत होता. तसेच संकेतस्थळावर दिलेले मोबाईल क्रमांकही तो बदलत असे. त्यामुळे त्याच्या ठावठिकाणा लागत नव्हता. विजयमाला पवार यांनी तांत्रिक तपासात त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याची वैयक्तिक माहिती घेतली. धायरीतील डीएसके विश्व सोसायटीत त्याने भाडेतत्त्वावर रो हाऊस घेतले होते. दुसऱ्या पत्नीसोबत तो तेथे राहात होता. कुलकर्णीला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या सासूची मदत घेतली. कुलकर्णीच्या दुसऱ्या पत्नीला तिच्या आईने आजारी असल्याची बतावणी केली. त्यानंतर ती आईला भेटण्यासाठी तेथे आली. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली, तेव्हा तिने कुलकर्णीची माहिती दिली. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा योग्य असल्याची खात्री करून पोलिसांनी डीएसके विश्वमध्ये सापळा लावला आणि त्या नियोजनानुसार तो पोलिसांच्या ताब्यात सापडला.

पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने संकेतस्थळाच्या माध्यमातून सात महिलांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. फसवणुकीच्या या प्रकारानंतर महिलांनी डेक्कन, येरवडा, विश्रामबाग, सिंहगड रस्ता, हिंजवडी, नवी मुंबईतील कोपरखैरणे, नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. हिंजवडी भागातील गुन्ह्य़ात त्याने विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले होते.

सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक निरीक्षक विजयमाला पवार, सागर पानमंद, उपनिरीक्षक नितीन खामगळ, अस्लम अत्तार, राजकुमार जाबा, संतोष जाधव, दीपक भोसले, अविनाश दरवडे, राहुल हंडाळ, आदेश चलवादी, शुभांगी मालुसरे यांनी ही कारवाई केली. कुलकर्णीने पुण्यासह राज्यातील अन्य शहरांमध्ये विवाहेच्छु महिलांची फसवणूक केली आहे. विशेषत: पुनर्विवाह करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना हेरून त्याने त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.