भुसुरुंग किंवा बॉम्ब शोधून ते नष्ट करू शकणाऱ्या स्वयंनियंत्रित रोबोची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) निर्मिती केली आहे. दिघी येथील ‘संशोधन आणि विकास संस्थे’मध्ये (आर अँड डी. ई.) संशोधन करून संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून  ‘मार्स’ (मोबाईल ऑटोनॉमस रोबोट सिस्टिम) हा रोबो विकसित करण्यात आला आहे.
शत्रूराष्ट्राने पेरलेले आणि अद्यापही न फुटलेले भूसुरुंग आणि बॉम्ब (इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस-आयईडी) ही सर्वच आशियाई देशांमध्ये गंभीर समस्या आहे. आपल्याकडील घुसखोरी आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये ‘आयईडी’ ही समस्या भेडसावत आहे. भूसुरुंग आणि बॉम्बचा शोध घेऊन ते नष्ट करण्याचे काम हे मानवी पद्धतीने होत होते. अशा घटनांमध्ये ते भूसुरुंग आणि बॉम्ब फुटून माणसे दगावण्याची तसेच कायमस्वरूपी जायबंदी होण्याचे प्रमाण अधिक असते. या रोबोमुळे हे भूसुरुंग आणि बॉम्ब यांचा शोध घेऊन ते उचलून सुरक्षित ठिकाणी नेण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सहजगत्या शक्य होणार असल्याची माहिती ‘आर. अँड डी. ई.’मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम. के. रॉय यांनी दिली. शास्त्रज्ञ व्ही. व्ही. परळीकर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले असून त्यामध्ये शास्त्रज्ञ एम. एम. कुबेर यांचाही समावेश आहे.
‘मार्स’मधील ऑटोनॉमस हा शब्द महत्त्वाचा आहे. या रोबोच्या अंतर्गत रचनेमध्ये संगणक (इनबिल्ट कॉम्प्युटर) बसविण्यात आला आहे. त्यामुळेच या रोबोला स्वत:चा ‘प्रोग्राम’ आहे. जेथे भूसुरुंग किंवा बॉम्ब आहे तेथे हे यंत्र जाते. त्या ठिकाणचे स्कॅनिंग करून त्याचे त्रिमिती (थ्री डायमेन्शनल) चित्र संगणकामध्ये तयार करते. त्यामुळे हा भूसुरुंग किंवा बॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेण्यास मदत होते. हा रोबो गोल्फ कार्टसारखा दिसणारा असून त्याला अंतर्गत सुरक्षा कवच आहे. त्यामुळे भूसुरुंग किंवा बॉम्ब नेताना तो चुकून फुटलाच तर, त्याचा रोबोवर कोणताही परिणाम होणार नाही, अशा स्वरुपाचे त्याला चिलखत आहे. हा रोबो कितीही अंतरावरून नियंत्रित करता येऊ शकतो. त्यामुळेच या रोबोचे महत्त्व हे केवळ लष्करालाच नाही, तर जेथे अर्धसैनिक बल काम करतात अशा ठिकाणीही आहे. पोलीसदेखील या रोबोचा वापर करू शकतात. भूसुरुंग ही समस्या असलेल्या आशियाई राष्ट्रांचा समावेश असलेला ‘एक्सरसाईज फोर्स १८’ हा संयुक्त लष्करी सराव नुकताच पुण्यामध्ये झाला. अशा सर्व देशांमध्ये हा रोबो उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास एम. के. रॉय यांनी व्यक्त केला.