मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अमृतांजन पूल ते पाथरगाव दरम्यान गेल्या वर्षभरात १३० अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जण जखमी झाले. या आकडेवारीमुळे अपघात रोखण्यासाठी पोलिसांची यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक असून वाहनचालकांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असल्याचे मुद्दे पुढे आले आहेत. गेल्या वर्षभरात महामार्ग पोलिसांनी १३ हजार ४६७ वाहनांवर या भागात कारवाई केली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची संख्या सातत्याने वाढत असून वाढत्या वाहनसंख्येबरोबरच या रस्त्यांवरील अपघातांची संख्याही वाढत आहे. द्रुतगती महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या तसेच जायबंदी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे ती एक चिंतेची बाब बनली आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच वाहनचालकांनी देखील वाहतूक नियमांचे पालन करणे, मार्गिकांची शिस्त पाळणे, वेग मर्यादेचे उल्लंघन न करणे, सांकेतिक वाहतूक खुणांचे पालन करणे अपेक्षित आहे. तसेच वाहनचालकांनी स्वयंशिस्त दाखवणेही गरजेचे आहे. मात्र वाहनचालकांकडून अनेक बाबींचे उल्लंघन महामार्गावर होते.
रस्ते विकास महामंडळाच्या पाहणीनुसार महामार्गावरील जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाले आहेत. त्यामुळे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी स्वयंशिस्त हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे खंडाळा महामार्ग पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक मोहन चाळके म्हणाले की, नियमांचा भंग करणाऱ्या चालकांवर आम्ही दंडात्मक कारवाई करतो. दंडात्मक कारवाई केल्यामुळे चालकाला तात्पुरती शिक्षा होते. मात्र अपघातांसारख्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकानेच नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. आपणामुळे दुसऱ्याला इजा पोहचणार नाही याचा विचार करून वाहने चालविल्यास अपघातांना आळा बसेल. गेल्या वर्षभरात महामार्ग पोलिसांनी १३ हजार ४६७ वाहनांवर कारवाई करून १४ लाख ३३ हजार रुपये एवढी दंड वसुली केली. वाहतूक सुरक्षा पंधरवडय़ानिमित्त आता वाहनचालकांना नियमांबाबत माहिती देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.