News Flash

‘एमबीबीएस’ डॉक्टरांना आयुर्वेदातील  पदव्युत्तर पदवीला थेट प्रवेश

‘एमबीबीएस’ डॉक्टरांना थेट आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवी करू देणे शासनाच्या विचाराधीन आहे.

प्रस्ताव विचाराधीन * उद्या दिल्लीत बैठक

‘एमबीबीएस’ डॉक्टरांना थेट आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवी करू देणे शासनाच्या विचाराधीन आहे. आयुष मंत्रालय आणि ‘सेन्ट्रल काउंन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ (सीसीआयएम) यांची बुधवारी (४ जानेवारी) दिल्लीत बैठक होणार असून त्यात अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांच्या आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवीबरोबरच दहावीनंतर दोन वर्षांचा ‘आयुर्वेद पूर्व’ (प्री-आयुर्वेद) अभ्यासक्रम सुरू करण्यावरही चर्चा होणार आहे.

आयुष मंत्रालयातर्फे सीसीआयएमला या बैठकीचा अजेंडा पाठवण्यात आला आहे. एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांना आयुर्वेदातील ‘एमडी’, ‘एमएस’ किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला थेट प्रवेश देण्याबाबत ‘इंडियन मेडिकल सेन्ट्रल काउंन्सिल अ‍ॅक्ट’मध्ये सुधारणा करणे, सध्याच्या साडेपाच वर्षांच्या आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमाच्या आधी आयुर्वेद पूर्व अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध करणे आणि ‘बीएएमएस’ अभ्यासक्रम चालवणारी कोणती आयुर्वेद महाविद्यालये अशा पूर्व आयुर्वेद अभ्यासक्रमासाठी इच्छुक आहेत हे पाहणे, हे विषय चर्चिले जाणार आहेत.

आयुर्वेदाबद्दल ज्या डॉक्टरांना काहीच माहिती नाही, ते थेट आयुर्वेदाची पदव्युत्तर पदवी कशी करू शकतील, असा प्रश्न आयुर्वेदिक डॉक्टरांकडून विचारला जात आहे. ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुहास परचुरे म्हणाले, ‘‘पूर्वी १९७० मध्ये सीसीआयएम अस्तित्वात नसताना एमबीबीएस डॉक्टरांना आयुर्वेदात ‘एमडी’ करण्याची मुभा होती. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आयुर्वेदाचे असे स्वायत्त अभ्यासक्रम चालत. परंतु नंतर आम्ही त्याला विरोध केला आणि सध्या ती परवानगी नाही. दहावीनंतर ‘प्री आयुर्वेद’ अभ्यासक्रमही पूर्वी चालवला जाई व हे विद्यार्थी नंतर साडेपाच वर्षांच्या आयुर्वेद अभ्यासक्रमास प्रवेश घेत. परंतु तोही बंद करण्यात आला. यात दहावीनंतरचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांस तो झेपत नसल्याचे जाणवले तर त्याचे वर्षही वाया जाऊ शकते.’’

‘सीसीआयएम’ कार्यकारिणीतील एका सदस्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, की या दोन्ही अभ्यासक्रमांबद्दल खासगी संघटना वा डॉक्टरांकडून शासनाकडे मागण्या करण्यात आल्या होत्या. ‘प्री-आयुर्वेद’ अभ्यासक्रमाची मागणी संस्कृतमधून  शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठीची आहे. त्यांना अकरावी व बारावीला भौतिकशास्त्र, गणित व जीवशास्त्र हे विषय, तसेच प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा ठेवण्याचा मुद्दाही समोर येईल. एमबीबीएस डॉक्टरांना ‘एमडी’ आयुर्वेद करू द्यायचे असेल, तर त्याचप्रमाणे आयुर्वेदाच्या डॉक्टरांनाही आधुनिक वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी करता येणार का, हाही प्रश्न आहेच.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:50 am

Web Title: mbbs doctor can take direct admissions in ayurveda degree
Next Stories
1 कॅपिटल बॉम्बस्फोटातील क्रांतिकारक हरिभाऊ लिमये यांचे निधन
2 शिवाजी रस्त्यावरील १८ पैकी ६ एटीएम केंद्रांमध्येच रोकड
3 ‘मराठा-माळी’ वर्चस्ववादात जातीचे गणित प्रभावी
Just Now!
X