अन्न व औषध प्रशासनाने औषधविक्रेत्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी सकाळी औषधविक्रेत्यांच्या संघटनेने संप मागे घेतला. आता पुण्यातील औषध दुकाने पूर्ववत खुली राहणार असल्यामुळे रुग्णांना होणारा त्रास वाचणार आहे.
जूनपासून ज्या औषधविक्रेत्यांवर एफडीएने कारवाया केल्या होत्या, त्या कारवाया मागे घ्याव्यात ही ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ची (सीएपीडी) प्रमुख मागणी होती. या मागणीवर संघटना व एफडीएच्या अधिकाऱ्यांची चर्चा होऊन ज्या औषध दुकानांवर १ जूनपासून कारवाया करण्यात आल्या त्यांच्या तपासणी अहवालाचे पुनर्विलोकन करण्याचे एफडीएने मान्य केले. तसेच औषध दुकानात नोंदणीकृत फार्मासिस्ट न आढळल्याच्या कारणास्तव दुकानाला ‘स्टॉप सेल’ नोटिस दिल्यानंतर दुकानदाराने फार्मासिस्टची नेमणूक केली तर दुकानाला त्वरित विक्री सुरू करण्याची परवानगी मिळेल, असेही एफडीएने मान्य केले.
‘पूर्वी फार्मासिस्टच्या अनुपस्थितीबद्दल औषध दुकानांना ‘स्टॉप सेल’ नोटिस मिळाल्यावर पुढची कारवाई होऊन दुकान सुरू होण्यासाठी २५ ते ४० दिवसांचा कालावधी लागत असे,’ अशी माहिती सीएपीडीचे सचिव विजय चंगेडिया यांनी दिली. एफडीएच्या सहायक आयुक्त विनीता थॉमस म्हणाल्या, ‘‘औषध दुकानात फार्मासिस्ट उपस्थित नसण्याबद्दल दुकानांना विक्री थांबवण्याची नोटिस दिली जात असे. त्यानंतर त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिस देऊन त्यावर पुढील कारवाई केली जात असे. आता फार्मासिस्ट उपस्थित नसल्यावर दुकानांना स्टॉप सेल नोटीस दिली जाईल परंतु दुकानदाराने फार्मासिस्टची नेमणूक केल्यावर त्वरित विक्री सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर उर्वरित कारवाई केली जाईल.’’
१ जूनपासून ज्या दुकानांवर एफडीएने कारवाया केल्या होत्या, त्या औषध विक्रेत्यांना वैयक्तिक सुनावणीच्या वेळी आपले म्हणणे मांडता येणार आहे. औषधविक्रेत्यांना अधिक मार्गदर्शन होण्यासाठी एफडीएच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची वेळ दिवसभर वाढवावी अशीही मागणी संघटनेने केली होती. ती देखील एफडीएने मान्य केली आहे.