उन्हाळी सुटय़ा सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील खासगी बसच्या प्रवासी वाहतुकीची सद्य:स्थिती पाहिल्यास सध्या मराठवाडा व विदर्भातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातून या भागात जाणाऱ्या गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी कमी आहे, मात्र येणाऱ्या गाडय़ा प्रवाशांनी भरून येत आहेत. दुष्काळी स्थितीमुळे हे चित्र निर्माण झाल्याचे वाहतूकदारांकडून सांगण्यात येत आहे. पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची मागणी लक्षात घेता विदर्भातून येण्यासाठी खासगी बसच्या भाडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे.
नोकरी व शिक्षणासाठी मराठवाडा व प्रामुख्याने विदर्भातील बहुतांश मंडळी पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. उन्हाळी सुटय़ा लागल्यानंतर मूळ गावी जाण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच विदर्भापाठोपाठ मराठवाडय़ात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अचानक वाढत असते. मागील कित्येक वर्षांपासूनच हेच चित्र पहायला मिळते. मात्र, यंदा हे चित्र काहीसे बदलले असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी स्थिती असल्याने अनेकांनी यंदाच्या उन्हाळ्यात गावी न जाता शहरातच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रवासी वाहतुकीच्या सद्य:स्थितीतून लक्षात येते आहे.
शहरातून विदर्भात जाण्यासाठी विविध खासगी वाहतूकदारांकडून रोज ऐंशीहून अधिक बस सोडल्या जातात. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, गोंदिया आदी ठिकाणी उन्हाळ्यात जाण्यासाठी प्रचंड मागणी असते. त्याचप्रमाणे मराठवाडय़ामधील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, िहगोली, जालना, नांदेड आदी भागांमध्ये प्रामुख्याने पुण्यातून प्रवासी जातात. मराठवाडय़ाकडे दररोज साठ ते सत्तर खासगी प्रवासी बस विविध वाहतूकदारांकडून सोडण्यात येतात. प्रवासी वाहतुकीची सद्य:स्थिती लक्षात घेता जाणाऱ्यांची संख्या फारशी नसली, तरी या भागातून येणाऱ्या गाडय़ा मात्र प्रवाशांनी भरभरून पुण्यात येत असल्याचे दिसून येते.
येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची तफावत लक्षात घेता, खासगी वाहतूकदारांकडून त्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे. विदर्भात जाण्यासाठी स्लीपर कोच प्रकारातील गाडीचे भाडे नेहमी आठशे ते हजार रुपयांपर्यंत असतो. पुण्यातून विदर्भात जाण्यासाठी बहुतांश खासगी वाहतूकदारांकडून हे भाडे आकारण्यात येत असले, तरी विदर्भातून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता येण्यासाठी मात्र सोळाशे रुपयांपर्यंत भाडे आकारणी करण्यात येत आहे. मराठवाडय़ात जाणाऱ्या बस भाडेबाबतही हीच स्थिती आहे. पुण्यातून जाण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये भाडे आकारणी केली जाते, मात्र पुण्यात येण्यासाठीचे भाडे सहाशे ते आठशे रुपये करण्यात आले आहे.