फ्टनंट जनरल समशेर सिंह यांची माहिती

संरक्षण उत्पादनामध्ये उपकरणे आणि तंत्रज्ञान आयात करण्यावर पूर्वी भर दिला जात असे. मात्र, आता खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या सहभागातून संरक्षण उत्पादनामध्ये कमीत कमी वेळात स्वयंपूर्ण होण्याचे धोरण लष्कराने स्वीकारले आहे, असे लष्कराच्या क्वालिटी अ‍ॅश्युअरन्स विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल समशेर सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. कंपनीच्या पाषाण येथील ‘फ्यूज कॉम्प्लेक्स’चे उद्घाटन लष्कराच्या क्वालिटी अ‍ॅश्युअरन्स विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल समशेर सिंह यांच्या हस्ते झाले. लष्कराच्या दारुगोळा विभागाचे महासंचालक मेजर जनरल अजय गहलोत आणि इंजिनिअिरग इक्विपमेंट विभागाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल संजयकुमार चौहान, भारत इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. गौतम, संचालक नटराज कृष्णप्पा आणि महाव्यवस्थापक दिनेश बात्रा या वेळी उपस्थित होते.

समशेर सिंह म्हणाले, संरक्षण उत्पादनांमधील परदेशी अवलंबित्व दूर करण्याकडे लष्कराने प्राधान्य दिले आहे. कमीत कमी कालावधीमध्ये देशाला स्वयंपूर्ण करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी खासगी आणि सार्वजनिक उद्योगांचे सहकार्य घेतले जात आहे. त्यामध्ये दारुगोळा कारखान्यांनाही आपले योगदान देताना स्पर्धा करावी लागणार आहे. शंभर टक्के स्वदेशीकरण करण्याच्या उद्देशातूनच पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ‘मेक इन इंडिया’चे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. दारुगोळा हा एकदाच वापरण्याच्या योग्यतेचा असतो. त्यामुळे प्रत्येक बॉम्ब, रडार आणि क्षेपणास्त्राच्या फ्यूजची तपासणी करणे शक्य होत नाही. सँपल स्वरूपातच ही तपासणी केली जाते. उत्तम दर्जाची फ्यूज निर्मिती करताना त्याची किंमतदेखील कमी करण्याचे ध्येय साध्य करावे लागेल. सर्वोत्तम निर्मिती आणि गुणवत्ता असलेला दारुगोळा घेऊन लढणाऱ्या बंदूकधारी जवानाला (गनर) आपल्याला काही होणार नाही हा आत्मविश्वास असायला हवा. या क्षेत्रात कार्यक्षमतेने सहभाग घेत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लष्कराला साहाय्यभूत ठरेल, असा विश्वास समशेर सिंह यांनी व्यक्त केला.

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने सिक्स सिग्मा गुणवत्ता प्रणाली स्वीकारली आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाचे उत्पादन करून लष्कराला साहाय्यभूत होण्यावर भर देण्यात आला असल्याचे एम. व्ही. गौतम यांनी सांगितले. नटराज कृष्णप्पा यांनी प्रास्ताविक केले. उपमहाप्रबंधक कॅप्टन राजू कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश बात्रा यांनी आभार मानले.