भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती होताच पिंपरी-चिंचवड शहरातील मुंडे समर्थकांच्या आनंदाला सीमा उरली नाही. त्याचे कारण वेगळेच होते. यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार पिंपरीचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचे पक्षातील ‘गॉडफादर’ होते. आता त्यांनाच पद सोडावे लागल्याने पवार यांची गच्छंती अटळ असल्याचे शहर भाजपमध्ये मानले जात आहे.
पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्यातील तीव्र संघर्षांमुळे प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती रखडली होती, त्याचा थेट फायदा पवार यांना मिळाला होता. मुदत संपल्यानंतरही अघोषित मुदतवाढ मिळाल्याने ते पदावर कायम होते. मात्र, गुढीपाडव्याच्या दिवशी आमदार फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे मुनगंटीवार यांचा ‘आधार’ घेत टिकून राहिलेल्या पवार यांनाही पदावरून जावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
बहुतांश पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही पवारांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागली होती. शहराध्यक्षपदावर काम करताना त्यांना सर्वाधिक काळ पक्षातील प्रतिस्पध्र्याशी संघर्ष करण्यातच घालवावा लागला. पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्याने पक्षाची बेअब्रू झाली होती. अमरावती व पिंपरी-चिंचवड या ठिकाणी पक्षाची सर्वात वाईट परिस्थिती असल्याने प्रदेश शाखेने अधोरेखित केले होते. त्यामुळे पवार यांची उचलबांगडी होण्याचे स्पष्ट संकेत होते. मात्र, पुन्हा त्याच पदावर बसण्याची मनिषा असलेल्या पवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती, मुनगंटीवार हे त्यांचा सर्वात मोठा आधार होते. ते पुन्हा पदावर बसले की आपलाही मार्ग मोकळा होणार असल्याची पवारांना खात्री होती. मात्र, प्रदेशात बदल होऊन फडणवीस यांची नियुक्ती झाल्याने पिंपरी शहराध्यक्षपदावरही बदल होईल, असा विश्वास पक्षातून व्यक्त करण्यात येतो आहे.